सोलापूर जिल्ह्यातील माढा परिसर सध्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक जीवशास्त्रीय शोधामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. सुमारे दीडशे वर्षांपासून लुप्तप्राय मानल्या गेलेल्या ‘क्रिसिला व्होल्युप’ (Chrysilla volupe) या अतिदुर्मीळ बहुरंगी कोळ्याची अधिकृत नोंद येथे झाली आहे. सामान्य भाषेत 'इंद्रधनुष्य कोळी' किंवा 'इलेगंत जंपिंग स्पायडर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सूक्ष्म जीवाचा शोध माढा महाविद्यालयाचे प्रा. मयूर दत्तात्रय चव्हाण यांनी लावला आहे. या शोधामुळे माढा परिसराचे समृद्ध नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

जर्मनीचे विख्यात जीवशास्त्रज्ञ फर्डिनांड कार्श यांनी १८७९ मध्ये गुजरात आणि श्रीलंकेतून या प्रजातीची पहिली शास्त्रीय नोंद केली होती. मात्र, त्यानंतर प्रदीर्घ काळ या कोळ्याचा कोणताही ठावठिकाणा न मिळाल्यामुळे ही प्रजाती नष्ट झाल्याचे मानले जात होते. २०१८ मध्ये केरळमधील वायनाड येथे ही प्रजाती पुन्हा दिसून आल्यानंतर जगभरातील प्राणिशास्त्रज्ञांचे लक्ष याकडे वेधले गेले. महाराष्ट्रात यापूर्वी ठाणे, सांगली आणि नागपूर येथे अत्यंत मर्यादित स्वरूपात आढळलेल्या या प्रजातीचे अस्तित्व आता सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातही सिद्ध झाले आहे.
आकाराने अवघ्या ४ ते ५ मिलीमीटर असलेल्या या कोळ्याच्या शरीरावर जांभळा, तांबडा, निळा, सोनेरी आणि फिकट पिवळा अशा विविध देखण्या रंगांच्या छटा असतात. याच्या डोक्यावर आठ डोळे असल्याने हा कोळी ३६० अंशांत चारही दिशांना एकाच वेळी पाहू शकतो. वनस्पतींवरील कीटकांची शिकार करून हा सूक्ष्म जीव निसर्गात नैसर्गिक कीटक नियंत्रक म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो.

प्रा. मयूर चव्हाण यांनी संकलित केलेली ही शास्त्रीय निरीक्षणे 'ग्लोबल बायोडायव्हर्सिटी इन्फॉर्मेशन फॅसिलिटी' आणि 'भारतीय जैवविविधता पोर्टल'वर समाविष्ट केली जात आहेत. या नोंदीमुळे माढा महाविद्यालय परिसर जागतिक जैवविविधतेच्या नकाशावर आला आहे. हा शोध जागतिक प्राणिशास्त्रज्ञांना पुढील सखोल संशोधनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, स्थानिक परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल.


