महाराष्ट्र : सेवानिवृत्त सनदी अधिकारी खेडकरांच्या घरी एसीबीचा छापा; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील; वादग्रस्त आणि बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. नाशिक आणि अहिल्यानगर एसीबीच्या पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी ही कारवाई केली. या कारवाईत खेडकर कुटुंबाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे चौकशीत समोर आल्याचे एसीबीने म्हटले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
30th September, 03:17 pm
महाराष्ट्र : सेवानिवृत्त सनदी अधिकारी खेडकरांच्या घरी एसीबीचा  छापा; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता

अहिल्यानगर : वादग्रस्त आणि बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. नाशिक आणि अहिल्यानगर एसीबीच्या पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी ही कारवाई केली. या कारवाईत खेडकर कुटुंबाकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे चौकशीत समोर आल्याचे एसीबीने म्हटले आहे.

या प्रकरणी दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत १०२ टक्के अधिक मालमत्ता संपादन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान घरातील विविध कागदपत्रे आणि मालमत्तेशी संबंधित नोंदी एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतल्या.

दिलीप खेडकर यांच्या १९९५ ते २०२३ या कालावधीतील उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेच्या व्यवहारांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार आणि शिरूर कासार यांसह विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता असल्याची कागदपत्रे तपासण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईसाठी ३० हून अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.

२०१२ मधील तक्रारीनंतर चौकशी

अहिल्यानगर येथील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी २०१२ मध्ये दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करत एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात ४० कोटींची संपत्ती

दिलीप खेडकर हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील भालगाव आहे. बी.ई. (मेकॅनिकल) शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राज्य शासनाच्या विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती. त्यांना १३ हजार ७४९ मते मिळाली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

दिलीप खेडकर यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्या भालगावच्या माजी सरपंच राहिल्या आहेत. पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने आयएएस सेवेतून बडतर्फ केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा