पाटणा : नेपाळच्या गंडक नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांवर पुराचे संकट निर्माण झाले आहे. गंडक नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे सोमवारी बगहा येथे तटबंदीला भगदाड पडले. त्यामुळे पश्चिम चंपारणसह आसपासच्या भागांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बिहारच्या जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ६ वाजता वाल्मीकिनगर गंडक बंधाऱ्यातून तब्बल ५ लाख ४३ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नोंदवण्यात आला. नदीचा विसर्ग १३ तासांहून अधिक काळ ५ लाख क्युसेकपेक्षा जास्त, तर ३२ तासांहून अधिक काळ ४ लाख क्युसेकपेक्षा जास्त राहिला. त्यामुळे पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
२६ आणि २७ सप्टेंबर रोजी पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण आणि गोपालगंजमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी आधीच वाढली होती. त्यातच मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे तटबंदीवर मोठा दबाव निर्माण झाला. परिणामी अनेक ठिकाणी पाणी झिरपणे, तटबंदीखालील भागातून पाणी वाहणे आणि पाणी तटबंदीवरून ओसंडून जाण्याच्या घटना घडल्या.
जलसंपदा विभागाने १६९ ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, २८ आणि २९ सप्टेंबरच्या मध्यरात्री तीन ठिकाणी तटबंदीला भगदाड पडले.
पश्चिम चंपारणमधील बगहा-१ भागातील खैराटवा गावाजवळ चंपारण तटबंदीच्या डाव्या बाजूला सुमारे १० मीटरचे भगदाड पडले. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरत असून ते पुढे पुन्हा नदीत जाण्याची शक्यता आहे. मात्र, अगस्तीया, खैराटवा आणि चंद्रपूर या गावांतील सखल भागांना पाणी साचण्याचा धोका आहे. बैरिया भागातील फुलियाखार गावाजवळही तटबंदीला भगदाड पडले आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात नदीच्या उजव्या तीरावरील तटबंदीला देखील भगदाड पडल्याची माहिती आहे.
पाण्याचा विसर्ग घटला; मात्र धोका कायम
मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वाल्मीकिनगर बंधाऱ्यातील पाण्याच्या विसर्गात घट होऊन तो १ लाख ९१ हजार २०० क्युसेक झाला. त्यामुळे पाण्याची पातळी ओसरण्याची चिन्हे दिसत असली, तरी पुराचा लोंढा पुढील सखल भागांकडे सरकत असल्याने काही ठिकाणी पाण्याची पातळी तात्पुरती वाढण्याची शक्यता आहे.
बचाव पथके तैनात
परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जलसंपदा विभाग आणि पश्चिम चंपारण जिल्हा प्रशासनाने बचाव व दुरुस्ती पथके तैनात केली आहेत. बगहा, बेतिया, मोतिहारी आणि गोपालगंज येथे वरिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तटबंदी दुरुस्ती आणि पूरप्रतिबंधक उपाययोजनांवर युद्धपातळीवर काम सुरू आहे.


