नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश भ्रष्ट राहिले असून, त्यांच्या कार्यकाळामुळे न्यायव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले, असा गंभीर आरोप ज्येष्ठ विधिज्ञ दुष्यंत दवे यांनी केला. न्यायव्यवस्था सध्या श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींच्या बाजूने झुकली आहे. त्यांनी न्यायव्यवस्थेवर आपला प्रभाव प्रस्थापित केला आहे, असा दावाही दवे यांनी केला.
‘के. एम. बशीर मेमोरियल लेक्चर’च्या १७व्या व्याख्यानात ‘आपण संविधानाचे अपयश ठरत आहोत का...’ या विषयावर बोलताना दवे यांनी न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.
दवे यांच्या म्हणण्यानुसार, देशातील न्यायव्यवस्था सर्वसामान्यांच्या हितापेक्षा श्रीमंत आणि शक्तिशाली घटकांच्या बाजूने अधिक झुकत चालली आहे. त्याचबरोबर कार्यकारी यंत्रणा अधिकाधिक शक्तिशाली होत असताना न्यायव्यवस्थेकडून तिला वाढता पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले.
न्यायव्यवस्थेतील या प्रवृत्तीमुळे संविधानाने घालून दिलेल्या लोकशाही मूल्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे दवे यांनी नमूद केले. न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आणि तिच्यावरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी या बाबींवर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


