पणजी :राज्यात चारचाकी वाहनांचे प्रमाण लक्षणीय असून, चारचाकी वाहनाने शाळेत किंवा शिक्षण संस्थेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गोवा देशात पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यातील ४.२ टक्के विद्यार्थी चारचाकीने प्रवास करतात. केंद्रीय सांख्यिकी खात्याच्या ‘भारतातील प्रवास २०२५-२६’ या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या अहवालासाठी देशभरातील सहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील सुमारे ४.९१ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गोव्यातील ८०० कुटुंबांचा समावेश होता. विद्यार्थी शाळेत कोणत्या पद्धतीने जातात आणि त्यांना शिक्षण संस्थेत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, याची माहिती या सर्वेक्षणातून गोळा करण्यात आली.
बसचा सर्वाधिक वापर
अहवालानुसार, गोव्यातील सर्वाधिक ६४.५ टक्के विद्यार्थी शिक्षण संस्थेत जाण्यासाठी बसचा वापर करतात. याची राष्ट्रीय सरासरी २९.५ टक्के आहे. याखालोखाल १७.५ टक्के विद्यार्थी दुचाकीने, तर ०.८ टक्के विद्यार्थी सायकलने शाळेत जातात. दुचाकी आणि सायकल वापराची राष्ट्रीय सरासरी अनुक्रमे ६.७ टक्के आणि १५.८ टक्के आहे.
गोव्यातील १३ टक्के विद्यार्थी चालत शाळेत जातात. याची राष्ट्रीय सरासरी ३७ टक्के आहे. त्यामुळे गोव्यात बसचा वापर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक, तर पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे अहवालातील आकडेवारीतून स्पष्ट होते.
चारचाकी वापरात सिक्कीम आघाडीवर
संपूर्ण देशात सिक्कीममध्ये सर्वाधिक २६.४ टक्के विद्यार्थी चारचाकी वाहनाचा वापर करतात. त्यापाठोपाठ नागालँडमध्ये १४.८ टक्के, मिझोरममध्ये १०.५ टक्के आणि मेघालयमध्ये ८.८ टक्के विद्यार्थी चारचाकीने प्रवास करतात. या यादीत ४.२ टक्क्यांसह गोव्याचा पाचवा क्रमांक आहे.
इतर राज्यांतील प्रवासाची पद्धत
अहवालानुसार, उत्तराखंडमध्ये सर्वाधिक ६८.८ टक्के विद्यार्थी चालत शाळेत जातात. पश्चिम बंगालमध्ये ४२.१ टक्के विद्यार्थी सायकलचा, तर मिझोरममध्ये ६७ टक्के विद्यार्थी दुचाकीचा वापर करतात. केरळमध्ये सर्वाधिक ७२ टक्के विद्यार्थी बसने शिक्षण संस्थेत पोहोचतात.
पायी प्रवास : उत्तराखंड — ६८.८ टक्के
सायकल : पश्चिम बंगाल — ४२.१ टक्के
दुचाकी : मिझोरम — ६७ टक्के
बस : केरळ — ७२ टक्के
प्रवासासाठी लागणारा वेळ
गोव्यातील विद्यार्थ्यांना घरापासून शिक्षण संस्थेत पोहोचण्यासाठी सरासरी २३ मिनिटांचा कालावधी लागतो. ही वेळ राष्ट्रीय सरासरीइतकीच आहे. तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांना प्रवासासाठी सर्वाधिक २७ मिनिटे, तर मिझोरममध्ये सर्वात कमी १५ मिनिटे लागतात.
बहुतांश विद्यार्थी सकाळी ७ ते ८ दरम्यान प्रवासाला
प्रवासाच्या वेळेबाबत, गोव्यातील ८२.७ टक्के विद्यार्थी सकाळी ७ ते ८ दरम्यान शाळेसाठी प्रवास सुरू करतात. ९.५ टक्के विद्यार्थी पहाटे ६ ते ७ दरम्यान, तर ७.८ टक्के विद्यार्थी सकाळी ८ ते ९ दरम्यान घरातून निघतात, असे अहवालात नमूद केले आहे.


