मडगाव :बाणावली येथे निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकी चालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मडगाव न्यायालयाने डॉ. महेंद्र कुडचडकर (५४, रा. मिरामार, पणजी) यांना एका महिन्याच्या साध्या कारावासाची आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मडगाव येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथमश्रेणी सबिनो ब्रागांझा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने ठोठावलेली ११ हजार रुपये दंडाची संपूर्ण रक्कम मृताच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.
२०२१ मध्ये बाणावली येथे अपघात
ही घटना २५ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.३२ वाजण्याच्या सुमारास बाणावली येथील दांडो मैदानाजवळ घडली होती. डॉ. कुडचडकर हे त्यांच्या इनोव्हा कारने कोलवा येथून वार्का येथे जात होते. त्यावेळी त्यांची कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली आणि समोरून येणाऱ्या मॅस्ट्रो स्कूटरला धडकली.
या अपघातात दुचाकी चालक हनुमंत हरिजन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
कोलवा पोलिसांकडून तपास
या प्रकरणी कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास केला. त्यानंतर प्रकरणाची सुनावणी मडगाव न्यायालयात झाली. न्यायालयाने डॉ. महेंद्र कुडचडकर यांना एका महिन्याच्या साध्या कारावासाची आणि ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपीचा हा पहिलाच गुन्हा असल्याने शिक्षेत सौम्यता दाखवावी, अशी विनंती बचाव पक्षाने न्यायालयाकडे केली होती. मात्र, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता केवळ पहिला गुन्हा आहे म्हणून अशा प्रकरणांत सवलत देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


