पणजी : माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रदेश अध्यक्ष दामू नाईक, इतर मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करतील. पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास आपण तयार असून उमेदवारीचा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रवेशापूर्वी व्यक्त केली. (Former Goa Chief Minister Laxmikant Parsekar is set to rejoin the Bharatiya Janata Party (BJP) after confirming his return to the party fold.)
प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या घरवापसीची चर्चा गेली बरेच दिवस सुरू होती. दिवाळीपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी गोव्याला भेट दिली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या भेटीपूर्वी पार्सेकर यांनी प्रदेश अध्यक्ष दामू नाईक व इतर पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या नवीन कार्यालयात भेट घेतली होती. अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. नबीन यांनी मंत्री, आमदार, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याबरोबर कोअर समितीची बैठक घेतली. मात्र, पार्सेकर यांचा काही भाजपात प्रवेश झाला नाही.
मात्र, शुक्रवारी दुपारपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. प्रवेश करण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे अटलभवनात आगमन झाले. भाजप सोडून अन्य कोणत्याही पक्षात मी प्रवेश केलेला नाही. त्यामुळे माझा प्रवेश म्हणजे औपचारिकता असल्याचेही पार्सेकर म्हणाले.
पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांचे स्वागत : दामू नाईक
पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षात सर्वांचे स्वागत आहे. पक्षासाठी ज्यांनी कार्य केलेले आहे, त्या सर्व अनुभवी व जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे माझे प्रयत्न आहेत. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे आज भाजपात प्रवेश करतील, अशे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, स्व. डॉ. सुरेश आमोणकर यांच्यासह राज्यात भाजपचे कार्य वाढविण्यात प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. २००२, २००७ व २०१२ अशा तीन विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मांद्रे मतदारसंघातून सलग विजय मिळविलेला आहे. २०१४ साली स्व. मनोहर पर्रीकर दिल्लीत संरक्षण मंत्री झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्याने सक्रीय राजकारणातून बाजूला पडले. गत विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते.


