भारत-न्यूझीलंडसाठी ‘करो या मरो’ स्थिती

तिसरा सामना आज : टीम इंडियाचे लक्ष्य मालिकाविजय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
17th January, 11:24 pm
भारत-न्यूझीलंडसाठी ‘करो या मरो’ स्थिती

इंदूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवार, १८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने हा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघापुढे ‘कराे या मरो’ स्थिती आहे.
मात्र या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर संघरचनेबाबत मोठा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या खराब फॉर्ममुळे त्याला अंतिम अकरामधून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत जडेजाला एकही विकेट घेता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याला केवळ एकच विकेट मिळाली होती. एकूण पाहता, जडेजाने मागील पाच वनडेत फक्त एक विकेट घेतली आहे. राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात त्याची फलंदाजीही निराशाजनक ठरली होती. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याच्यावर जोरदार टीका झाली.
तिसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मोहम्मद सिराज याने जडेजाच्या फॉर्मबाबत भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, मला वाटत नाही की जडेजाच्या फॉर्मबद्दल चिंता करण्याचे कारण आहे. त्याला फक्त एका विकेटची गरज आहे. एकदा ब्रेकथ्रू मिळाला की तो वेगळ्याच पातळीवर गोलंदाजी करेल.
राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली. या सामन्यात भारताच्या मधल्या षटकांमधील गोलंदाजीचा कमकुवतपणा स्पष्टपणे दिसून आला. विशेषतः कुलदीप यादव याला मोठा संघर्ष करावा लागला. डॅरिल मिशेलने त्याच्या गोलंदाजीवर सहज धावा काढत शतक झळकावले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकी गोलंदाजांचे चेंडू स्वीप शॉट्सच्या मदतीने प्रभावीपणे खेळून काढले. याउलट, न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांवर सातत्याने दबाव ठेवण्यात यशस्वी ठरले.
जडेजाला विश्रांती देऊन दिल्लीचा अष्टपैलू आयुष बदोनी याला संधी दिली जाऊ शकते. बदोनीला दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात घेण्यात आले आहे. तो मधल्या फळीत फलंदाजीसह सहावा गोलंदाज म्हणून उपयुक्त ठरू शकतो.
याशिवाय, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याला संधी देण्यात आली नव्हती आणि प्रसिद्ध कृष्णाला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र प्रसिद्धने विकेट्स घेतल्या असल्या तरी तो फारसा प्रभावी ठरलेला नाही.
सिराज म्हणाला, पहिल्या दोन सामन्यांत आम्ही चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात काही झेल सुटले. ते पकडले असते तर निकाल वेगळा असू शकला असता. डॅरिल मिशेलसारखे जागतिक दर्जाचे फलंदाज संधी देत नाहीत. ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप सकारात्मक आहे. विजय-पराजय होत असतात, पण संघातील एकी कायम आहे.
विजयाने सुरुवात, दुसऱ्या सामन्यात पराभव
मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत विजय मिळवला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात के. एल. राहुल याने झुंजार शतक झळकावले, पण इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारत मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल याने शानदार शतक, तर विल यंग याने संयमी खेळी करत भारताचा पराभव घडवून आणला.
भारताचा अभेद्य गड, पण चिंतेचे कारण
भारतीय भूमीवर न्यूझीलंडला आजवर एकदाही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. भारताचा हा अभेद्य गड भेदण्याचा त्यांचा प्रयत्न यंदाही सुरू आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने या मालिकेसाठी आपला सर्वात बलाढ्य संघ पाठवलेला नसतानाही त्यांनी मालिका बरोबरीत आणली आहे, ही बाब भारतीय संघासाठी चिंतेची मानली जात आहे.
‘लकी’ होळकर स्टेडियम देणार साथ?
निर्णायक सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हे मैदान भारतीय संघासाठी अत्यंत भाग्यवान मानले जाते, कारण भारताने येथे आजवर एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. ही आकडेवारी भारतीय संघाला मानसिक बळ देणारी असली, तरी मैदानावर प्रत्यक्ष कामगिरी करणेच निर्णायक ठरणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारावी लागेल, तर गोलंदाजांना न्यूझीलंडचे फलंदाज लवकर बाद करावे लागतील. इंदूरच्या रणधुमाळीत टीम इंडिया विजयाचा झेंडा फडकवते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या सामन्यापेक्षा सध्या भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल एका विशेष मशीनमुळे चर्चेत आला आहे. इंदूरमधील पाण्याच्या संकटामुळे गिलने स्वतःच्या सुरक्षेसाठी मोठी खबरदारी घेतली आहे.
शुभमन गिलने इंदूरला येताना आपल्यासोबत सुमारे ३ लाख रुपयांचे एक विशेष ‘वॉटर प्युरिफिकेशन मशीन’ आणले आहे. हे मशीन त्याने हॉटेलमधील स्वतःच्या रूममध्येच बसवून घेतले आहे. हे मशीन साधे आरओ (आरओ) किंवा बाटलीबंद पाणी देखील पुन्हा एकदा पूर्णपणे शुद्ध करण्यास सक्षम आहे. इंदूरमधील भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता गिलने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
देशातील सर्वांत स्वच्छ शहर मानल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये सध्या दूषित पाण्यामुळे भीतीचे वातावरण आहे. भागीरथपुरा भागात खराब पाण्यामुळे आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. १६ हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून डेंग्यू आणि डायरियाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंना कोणताही धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.केवळ पाणीच नाही, तर खेळाडूंच्या अन्नाबाबतही बीसीसीआय अत्यंत सतर्क आहे. खेळाडूंच्या फिटनेस आणि डाएटसाठी बोर्डाने खास शेफ सोबत पाठवले आहेत.विराट कोहली: विराटच्या आहारात प्रामुख्याने उकडलेले आणि वाफवलेले अन्न आहे. रोहित शर्मा: रोहितच्या डाएटमध्ये बदाम, स्प्राउट्स, ओट्स, फळे, पनीर, डाळ आणि भाताचा समावेश आहे.प्रत्येक खेळाडूच्या शरीराची गरज ओळखून हे शेफ वैयक्तिक स्तरावर जेवण तयार करत आहेत.
इंदूरची खेळपट्टी फलंदाजांना पोषक
इंदूरचे मैदान लहान चौकार आणि फलंदाजीस पोषक खेळपट्टीसाठी ओळखले जाते. त्यामुळे हा सामना उच्च धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारताला योग्य गोलंदाजी संयोजन निवडणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
भारताचा संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर,
आयुष बदोनी, केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जॅक फॉल्क्स, मिच हे, काइल जेमिसन, निक केली, जेडेन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.
आजचा सामना
भारत विरुद्ध न्यूझीलंड

वेळ : दु. १.३० वा.
स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर
प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार