पर्वरीत भीषण अपघात; दिल्लीच्या १८ वर्षीय युवतीचा मृत्यू

इनोव्हाने अर्टिगाला दिली जोरदार धडक : ६ जण गंभीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th November, 11:02 pm
पर्वरीत भीषण अपघात; दिल्लीच्या १८ वर्षीय युवतीचा मृत्यू

पणजी : पर्वरी येथील होली फॅमिली चर्च जंक्शनवर सोमवारी पहाटे इनोव्हा आणि अर्टिगा कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दिल्ली येथील १८ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. या अपघातात तिच्या कुटुंबीयांसह एकूण सहा जण जखमी झाले असून, पोलिसांनी कार चालकाविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

हा अपघात सोमवारी पहाटे २.२० च्या सुमारास घडला. जीए ०३ एएच ५११७ क्रमांकाची ‘रेंट अ कॅब’ मारुती अर्टिगा घेऊन पर्यटक कुटुंबीय कळंगुटहून पर्वरी येथील कदंब डेपोच्या दिशेने जात होते. त्याचवेळी संशयित चालक आपल्या मित्रासह जीए ०७ एफ ८४१० क्रमांकाची इनोव्हा कार (पर्यटक टॅक्सी) घेऊन म्हापशाहून पणजीच्या दिशेने भरधाव येत होता.

इनोव्हाची जोरदार धडक

होली फॅमिली चर्च जंक्शन ओलांडणाऱ्या अर्टिगा कारला भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, अर्टिगा कार रस्त्याच्या बाजूच्या दुकानावर जाऊन आदळली. कारच्या मागील दरवाजाजवळ बसलेली लावण्या जून (१८, रा. दिल्ली) ही युवती या धडकेमुळे गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

सहा जण गंभीर जखमी

या अपघातात मयत युवतीचे कुटुंबीय चेतन चावला (३७, चालक), रिया जून (३८), यश गोहट (२०), हर्ष गोहट (२२), गरीमा चौधरी (३८) आणि खुशी गोहट (२०) हे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

या अपघातात संशयित कारमधील चालक मलिक रिहान खतीब (२२, रा. रामनगर, बेती) व त्याचा मित्र रोशन निसार शेख (२८) हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावरही गोमेकॉत उपचार करण्यात आले. पोलिसांनी मलिक रिहान खतीब याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याच्या आरोपासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा