बनावट जन्म प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविणाऱ्या आयआरबी काॅन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

खात्याअंतर्गत चौकशीनंतर एफआयआर नोंद


6 hours ago
बनावट जन्म प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळविणाऱ्या आयआरबी काॅन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करून गोवा पोलीस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) पोलीस काॅन्स्टेबल पद मिळविल्याबद्दल पणजी पोलिसांनी अरुण सलमान येद्यानापौडी (मूळ आंध्र प्रदेश, रा. चिंबल) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस मुख्यालयाचे अधीक्षक धर्मेश आंगले यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आयआरबी काॅन्स्टेबल अरुण सलमान येद्यानापौडी याने बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केले आहे. अरुण याने २४ नोव्हेंबर १९९७ रोजी आंध्र प्रदेश येथे जन्म झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. हे प्रमाणपत्र त्याने आयआरबी काॅन्स्टेबल भरतीवेळी सादर केले होती. प्रमाणपत्राची व इतर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस खात्याने अरुण सलमान येद्यानापौडी याला कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त केले. याच दरम्यान त्याच्या बनावट प्रमाणपत्राची माहिती खात्याला मिळाली. खात्याअंतर्गत प्राथमिक चौकशी केली असता, सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.
अरुणला चौकशीस हजर राहण्याची नोटीस
बनावट प्रमाणपत्र दिल्यानंतर पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपना गावस यांनी अरुण सलमान येद्यानापौडी याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. याच दरम्यान पोलिसांनी अरुण याला नोटीस बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे.