पहिल्या डावात वेस्ट इंडिजची लाजिरवाणी ‘शरणागती’

बुमराह-सिराजच्या भेदक माऱ्याने १६२ धावांत डाव गुंडाळला

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
11 hours ago
पहिल्या डावात वेस्ट इंडिजची लाजिरवाणी ‘शरणागती’

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीला आज (गुरुवार) सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत पाहुण्यांचा डाव नामोहरम केला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ४४.१ षटकांत १६२ धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या अचूक व भेदक माऱ्याने पाहुण्यांची दाणादाण उडाली. भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद १२१ धावा केल्या आहेत. के.एल. राहुलने संयमी अर्धशतक करत संघाला स्थैर्य दिले. भारत अजून ४१ धावांनी पिछाडीवर आहे.
भारताकडून मोहम्मद सिराजने १४ षटकांत ४० धावांत ४ बळी घेतले. त्याचा प्रत्येक चेंडू आक्रमक वृत्तीने टाकला गेला आणि वेस्ट इंडिज फलंदाजांसमोर त्याने अनेकदा गोंधळ निर्माण केला. उपकर्णधार जसप्रीत बुमराहनेही १४ षटकांत ४२ धावांत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. या दोघांनी मिळून वेस्ट इंडिजच्या टॉप ऑर्डरला उध्वस्त केले. फिरकी विभागातून कुलदीप यादवने ६.१ षटकांत २५ धावांत २ बळी घेतले, तर वॉशिंग्टन सुंदरने १ बळी घेतला.
भारताविरुद्ध कसोटीत पहिल्याच डावात इतक्या कमी षटकांत बाद होणारा वेस्ट इंडिज हा दुसरा परदेशी संघ ठरला. यापूर्वी २०१९ मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या डे-नाईट कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या ३०.३ षटकांत आटोपला होता.त्या विक्रमाजवळ वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आल्याने त्यांची अवस्था किती बिकट आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
वेस्ट इंडिजकडून फक्त तीनच फलंदाज काही काळ टिकाव धरू शकले. जस्टिन ग्रीव्हसने सर्वाधिक ३२ धावा केल्या. शाय होपने २६ तर कर्णधार रॉस्टन चेसने २४ धावा केल्या. याशिवाय बाकीचे सर्व फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या जाळ्यात अडकले. केवळ बचावात्मक फलंदाजी करताना ते वेळ घालवू शकले नाहीत. नव्या चेंडूपुढे त्यांची स्थिती अधिकच दयनीय दिसून आली.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. बुमराह-सिराजच्या जोडीने सतत वेगवान मारा करत विकेट घेतल्या. एकीकडे फिरकी गोलंदाजांनी योग्य वेळी ब्रेकथ्रू मिळवले. फलंदाजीतही भारतीयांना आता अनुकूल परिस्थिती लाभणार असून पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवण्याची संधी आहे.
वेस्ट इंडिजने भारतात गेल्या १० डावांपैकी फक्त एकदाच १०० षटकांपर्यंत टिकून राहण्याचा पराक्रम केला आहे. हे आकडे त्यांच्या कसोटीतील सातत्यपूर्ण अपयशाची ग्वाही देतात.
बुमराहने मायदेशात गोलंदाजी करताना २४ व्या डावात ५० गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात त्याने माजी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जवागल श्रीनाथ यांनी देखील २४ व्या डावात गोलंदाजी करताना ५० गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. दिग्गज गोलंदाज कपिल देव यांनी हा पराक्रम २५ व्या डावात केला होता. तर ईशांत शर्माने २७ व्या डावात गोलंदाजी करताना ५० गडी बाद केले होते.


मायदेशात जलद ५० गडी बाद भारतीय गोलंदाज
जसप्रीत बुमराह : २४ डावात
जवागल श्रीनाथ : २४ डावात
कपिल देव : २५ डावात
ईशांत शर्मा : २७ डावात
मोहम्मद शमी : २७ डावात

मोहम्मद सिराजची ऐतिहासिक कामगिरी
या सामन्यात मोहम्मद सिराजने २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) खेळणाऱ्या सर्व संघांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. सिराजने २०२५ मध्ये आतापर्यंत ७ कसोटी सामन्यांमधील १२ डावांत एकूण ३० बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा बळी घेताच त्याने या वर्षीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकले, ज्याने १४ डावांत २९ विकेट्स घेतल्या आहेत.

डब्ल्यूटीसी २०२५ मध्ये सर्वाधिक बळी घेणार गोलंदाज:

मोहम्मद सिराज : ३० बळी (१२ डाव) 
मिचेल स्टार्क : २९ बळी (१४ डाव)
नॅथन लायन : २४ बळी (११ डाव)
शमार जोसेफ : २२ बळी (६ डाव)
जोश टंग : २१ बळी (८ डाव)

जसप्रीत बुमराहचा विक्रम
जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात तीन बळी घेतले. त्याने सलामीवीर जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हस आणि जोहान लेन यांना माघारी पाठवले. यासह बुमराहने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (डब्ल्यूटीसी) भारतीय भूमीवर ५० विकेट्स पूर्ण केले. तो डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर ५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आर अश्विन (१४९ विकेट्स) आणि रवींद्र जडेजा (९४ विकेट्स) यांनी डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर ५० पेक्षा जास्त विकेट्स घेतले आहेत, परंतु हे दोघे फिरकी गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराहने डब्ल्यूटीसीमध्ये भारतीय मैदानावर एकूण १३ सामने खेळले असून यात त्याने ५० विकेट्स घेतले आहेत. ४५ धावांत ६ बळी हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.