कृषी महाविद्यालयात लवकरच अन्न प्रक्रियेचे धडे

अभ्यासासोबतच राबवणार कृषी आधारित संशोधन, तंत्रज्ञान उपक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th June, 12:16 am
कृषी महाविद्यालयात लवकरच अन्न प्रक्रियेचे धडे

पणजी : जुने गोवा कृषी महाविद्यालयात लवकरच अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. महाविद्यालयाने यासाठी आवश्यक जागा आणि उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. सुरेश कुंकळ्येकर यांनी दिली. कृषी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

दरम्यान, जुने गोवा येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा विस्तार सुरू आहे. महाविद्यालय अभ्यासक्रमासोबतच शेतीवर आधारित मोठ्या प्रमाणात संशोधन उपक्रम राबवणार आहे, ज्यात अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे. डॉ. कुंकळ्येकर यांनी सांगितले की, या अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, ड्रायर, मिक्सर आणि इतर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानावर एकूण ३० लाख रुपये खर्च झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन कृषी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

'गोवन प्रकल्पांतर्गत' पाळी आणि कुडचडे येथे अन्न प्रक्रिया केंद्रे उभारण्यात आली आहेत. गोव्यात फणस, आंबा, कोकम, काजू आणि अननस यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या स्थानिक उत्पादनांवर आधारित पदार्थांवर विशेष भर दिला जाईल. या सर्व साहित्यांसाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाईल. फणस, आंबे आणि काजूपासून नवीन पदार्थ बनवण्यासही या प्रशिक्षणात वाव आहे. साठा, लोणची आणि जॅम यांसारख्या उत्पादनांचा खर्च कसा कमी करायचा यावरही भर दिला जाईल.

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवे रूप
- फणसापासून तळलेले गरे रोल, धोणस, साठा, केक, पापड आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
- कोकम सोलांना जास्त मागणी असून, कोकम सिरप आणि सोलकडी बनवण्यासाठी त्यांचा वापर कसा करावा हे शिकवले जाईल.
- अननसापासून जॅम बनवण्याची जुनी परंपरा आहे.
- आंब्याच्या साठ्यासोबतच कैरीचे लोणचेही बनवले जाते.
स्वयं-मदत गट आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण
स्वयं-मदत गट तसेच शेतकऱ्यांना विविध तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी नोंदणी आवश्यक आहे. केंद्राच्या उद्घाटनानंतर प्रशिक्षण शुल्क तसेच इतर बाबी अंतिम केल्या जातील. हे प्रशिक्षण केंद्र राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता ठेवते, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.