स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण

एखाद्या नेत्याच्या स्मरणार्थ पुतळे उभारण्याऐवजी जर वृक्षारोपण करून त्याचे संगोपन झाले तर माणसाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे संभव आहे.

Story: विचारचक्र |
10th June, 09:10 pm
स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण

समस्त विश्व आज तापमान वाढीच्या आणि हवामान बदलाच्या संकटात सापडलेले असल्याने आगामी काळात येणाऱ्या संकटातून मानवी समाजाचे जगणे सुसह्य करण्यासाठी आपापल्या परिसरात वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. गेल्या तीन दशकांपूर्वी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वन खात्याने ना वर्तमान ना भविष्याचा विचार करून इथे आकेशिया, युकालिपट्स अशा विदेशी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड केली. या वृक्षांच्या बेसुमार आणि बेशिस्तीने केलेल्या लागवडीने कित्येक जंगली श्वापदांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात टाकलेला आहे. कुठे आणि कशी लागवड करावी, हे तारतम्य न पाळता विदेशी वृक्ष वनस्पतींच्या लागवडीने वन्यजीवांचे जगणे प्रतिकूल केलेले आहे. रानात गवे, रानडुक्कर, माकडे, वानरे आदी प्राण्यांसाठी असलेल्या अन्नांचे घटक मिळणे मुश्किल झाल्याने त्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवलेला आहे. या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याची इच्छा असेल तर समाजवादी विचारवंत ग. प्र. प्रधान यांच्या विचारधारेची कास धरणे गरजेचे आहे. ग. प्र. प्रधान यांनी म्हटलेले आहे, 'माझ्या पश्चात माझे कसलेही स्मारक करू नये. माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रांनी माझी आठवण म्हणून एक झाड लावावे आणि ते पाच वर्षे तरी जगेल, अशी व्यवस्था करावी. माझ्याबद्दल आपुलकी वाटणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावावीत आणि ती पाच वर्षे जगतील, अशी व्यवस्था करावी. समाजाने आणि तुम्ही मित्रांनी माझ्या अपूर्णतेसह मला स्वीकारले, माझ्यावर प्रेम केले, माझे दोष क्षम्य मानले याबद्दल आभार मानण्यास मजजवळ पुरेसे शब्द नाहीत.' 

प्रधान सरांनी जी इच्छा व्यक्त केली त्याचा स्वीकार करण्याची आज नितांत गरज आहे. कब्रस्थान, स्मशानभूमी, ग्रेव्ह यार्डात नव्हे तर जेथे जेथे मोकळी, आपल्या मालकीची जागा असेल तेथे स्वदेशी वृक्षवनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीसाठी आम्ही एखाद्या सदाहरित किंवा फळे-फुले देणाऱ्या वृक्षाची लागवड केली तर त्या त्या परिसरातील लोकांना फक्त थंडगार सावलीच नव्हे तर त्यांच्या फळाफुलांचा आस्वाद घेणे शक्य होईल. पूर्वीच्या काळी रस्त्याच्या दुतर्फा प्रवाशांना शीतल आणि आल्हाददायक सावली मिळावी म्हणून मौर्य सम्राट अशोक यांनी डेरेदार वृक्षांची लागवड करण्याची राजाज्ञा दिली होती. ब्रिटिश अमदानीत गदग - बेंगलोर मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळासारखी झाडे लावली जात होती. या वृक्षांमुळे पायी किंवा वाहनाने प्रवास करणाऱ्यांना त्रास जाणवत नव्हता. आज वन महोत्सवाच्या प्रसंगी वन खात्यामार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला जातो, परंतु वृक्षारोपण करताना जी रोपे सहज उपलब्ध असतील आणि खतपाणी घालण्याची, त्यांची निगा राखण्याची जबाबदारी घेण्याची गरज नसेल, अशीच झाडे लावण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे चटावरच्या श्राद्धासारखे असणारे असे कार्यक्रम करण्यापेक्षा जबाबदारीपूर्ण वृक्षारोपण आणि तितक्याच आत्मियतेने त्यांचे संगोपन करण्याला महत्त्व दिले पाहिजे. प्रधान सरांनी आपल्या मृत्युपत्रात सिमेंट काँक्रिटचे स्मारक उभारण्याऐवजी वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन करण्याकडे लक्ष देण्यास सांगितले होते. प्रधान सरांची ही विचारधारा आज आपण अवलंबन करण्याची गरज आहे.

आज एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, हिंदू पद्धतीने त्याच्या देहदहनासाठी लाकडांची भलीमोठी चिता रचून होणारा अंत्यसंस्कार वृक्षांच्या विनाशाला कारणीभूत होत असतो. त्यासाठी कमीत कमी लाकडांचा वापर करून शिस्तबद्धरित्या चिता रचावी व जेथे विद्युतचलित शवदहन यंत्रणा उपलब्ध असेल तेथे तिचा वापर करावा. वृक्षाच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्तीची स्मृती ठेवण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. पूर्वीच्या काळी गोव्यात आणि कोकणात राष्ट्रोळी, दाडदेव, देवचार आदी लोकदैवतांच्या स्मृतीसाठी वड, पिंपळ, आंबा, फणस आदी वृक्षांची राखण केली जायची. ही डेरेदार झाडे म्हणजे त्या देवतांचे निवासस्थान मानले जायचे. आज ही पवित्र झाडे कापून त्याजागी सिमेंट काँक्रिटची देवस्थाने उभारण्याचे षडयंत्र सफल ठरत आहे. मानवी समाजाला प्राणवायूचा आश्वासक पुरवठा करण्यासाठी वृक्षांचे योगदान आज विस्मृतीत जात असून आपल्या पूर्वजांचा पर्यावरणीय वारसा आम्ही विसरत चाललो आहोत. प्रधान सरांसारखी आपल्या मृत्यूनंतर वृक्षारोपण करण्याची इच्छा व्यक्त करून त्यांच्या संगोपनाची आस धरणारी माणसे दुरापास्त होऊ लागलेली आहेत. संपूर्ण देशात जंगलांचे आच्छादन विस्कळीत होत चालले असून त्यामुळे धुवांधार पर्जन्यवृष्टी किंवा ढगफुटीचे संकट आपल्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना आपल्या भूगर्भात साठवून ठेवण्याची क्षमताच आज नाहीशी होत चाललेली आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील माळीण गावाप्रमाणे देशातील बऱ्याच गावांचे अस्तित्व दुर्बल होऊन झोपेत असताना सारा गाव कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली गायब होण्याची पाळी कशामुळे येते? त्या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे? याचा उहापोह करून आगामी काळात अशा दुर्घटना उद्भवू नयेत म्हणून गांभीर्याने अभावानेच उपाययोजनेसाठी कृती कार्यक्रम हाती घेतले जातात. उत्तराखंड, माळीण, चिपळूण , केरळ, काश्मीर आदी ठिकाणी आलेल्या आपत्तींमुळे आपले डोळे कधी आणि केव्हा उघडतील? भारतीय संस्कृतीने भगवान शंकराला वटवृक्ष, विष्णूला पिंपळ, श्रीकृष्णाला कदंबाचे झाड प्रिय असल्याचे मानून त्यांच्या संरक्षणाला आणि संवर्धनाला प्राधान्य दिलेले आहे. जो मनुष्य एक पिंपळ, एक कडुलिंब, एक वड, दहा आवळे, तीन कवठे, बेल, चिंचेची झाडे व पाच आंब्याची झाडे लावेल, त्याला नरकापासून मुक्ती मिळू शकेल, असे भारतीय संस्कृती सांगते. घराच्या पूर्वेला वड, दक्षिणेला उंबर, पश्चिमेला पिंपळ लावला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी प्रत्येक गावात वावरणाऱ्या अदृश्य शक्तींच्या प्रीत्यर्थ महावृक्षांना राखून ठेवलेले आहे. 

आपल्या राज्यघटनेनुसार इथल्या सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध हवा, निर्मळ पाणी आणि सकस अन्न पुरविण्याच्या दृष्टीने आपले सरकार हतबल ठरत आहे. एखाद्या नेत्याच्या स्मरणार्थ पुतळे उभारण्याऐवजी जर वृक्षारोपण करून त्याचे संगोपन झाले तर माणसाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे संभव आहे. आज हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचे संकट काय करू शकेल, याची प्रचितीही येणे कठीण झालेले आहे आणि त्यामुळे बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना थोपवण्यासाठी प्रत्येक परिसराची स्थिती ओळखून त्या त्याप्रमाणे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले तर ते आपणाला फायदेशीर ठरेल. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर लावलेले वृक्ष जेव्हा फळे, फुले, सावली देतील, वनौषधी प्रदान करतील, तेव्हा त्या व्यक्तीची स्मृती चैतन्यशाली होईल. दगडी पुतळे, स्मृती स्मारके उभारून आम्ही भूमीसमोर असंख्य संकटे निर्माण करीत असतो. त्यामुळे स्मृतीप्रीत्यर्थ उभा असलेला वृक्ष आपण त्याचे मनःपूर्वक संगोपन केले तर आपणाला जीवनदायी आणि उत्साहवर्धक ठरेल, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. ज्येष्ठातील पौर्णिमा, वट पौर्णिमा म्हणून साजरी करताना. वट वृक्षांच्या फांद्या छाटण्याऐवजी वट वृक्षांची नव्याने लागवड करताना, जुने वृक्ष संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी दूरगामी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५)