राज्यात अवयवदानात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या दुपटीहून अधिक

एकूण दात्यांमध्ये ७० टक्के महिलांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd March, 12:25 am
राज्यात अवयवदानात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या दुपटीहून अधिक

पिनाक कल्लोळी

पणजी : अवयव दान हे श्रेष्ठ दान समजले जाते. अवयवदान करून दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात राज्यातील महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. गोव्यात अवयवदानाची प्रक्रिया, नियमन हे राज्य अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेतर्फे (सोटो) केले जाते. सोटोने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत झालेल्या जिवंतपणीच्या मूत्रपिंड (किडनी) दानात महिला दात्यांची संख्या पुरुषांच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणास्तव मूत्रपिंड निकामी झाल्यास त्या व्यक्तीच्या जवळच्या नात्यातील कुटुंबातील व्यक्ती मूत्रपिंड देण्यासाठी पुढे येतात. यामध्ये प्रामुख्याने महिला दाते अधिक आहेत. आतापर्यंत राज्यात ४९ जणांनी जिवंतपणी मूत्रपिंड (किडनी) दान केले आहे. यातील ७० टक्के म्हणजेच ३४ दाते या महिला होत्या. तर १५ दाते (३० टक्के) पुरुष होते. राज्यातील ४९ मूत्रपिंड दानांपैकी ३५ मूत्रपिंडांचे पुरुष रुग्णांत, तर १४ मूत्रपिंडांचे महिला रुग्णांत प्रत्यारोपण करण्यात आले.
एखादी व्यक्ती ब्रेन डेड झाल्यावर तिच्या कुटुंबियांच्या इच्छेने ब्रेन डेड व्यक्तीचे अवयवदान केले जाते. आतापर्यंत अशा ८ ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव गरजू रुग्णांना देण्यात आले आहेत. यामध्ये ७ पुरुष, तर १ महिला दाते होते. त्यांचे १६ मूत्रपिंड, ७ यकृत, ४ हृदय आणि २ फुफ्फुस दान करण्यात आले आहेत. यातील दान करण्यात आलेल्या १६ मूत्रपिंडांपैकी ११ पुरुष, तर ५ महिला गरजूंना देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात कॉर्नियल प्रत्यारोपण आल्याची माहिती सोटोकडून मिळाली आहे.
राज्यात गोमेकॉसह अन्य काही खासगी इस्पितळात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते. अवयवदान करण्यासाठी राज्य सरकार तसेच सोटोकडून जागृती केली जात आहे. आतापर्यंत राज्यात १३०० लोकांनी अवयवदानाची शपथ घेतली आहे. सोटो अवयवदान, अवयव गरजूंना देणे, गरजूंची प्रतीक्षा यादी अद्ययावत ठेवणे, अवयवदानाबद्दल प्रशिक्षण देणे, राष्ट्रीय अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेसोबत समन्वय ठेवून त्यांच्या विविध योजना राज्यात राबवणे इत्यादी कामे करत आहे.
प्रतीक्षा यादीत ६८ जण
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीच्या प्रतीक्षा यादीत एकूण ६८ जणांचा समावेश आहे. यातील ५२ प्रकरणे सक्रिय असून १६ निष्क्रिय आहेत. या सर्वांना मूत्रपिंड दान केलेल्या दात्याची आवश्यकता आहे.