अहवाल श्रेष्ठींना सादर : जिंकू न शकणाऱ्यांना मिळणार डच्चू
पणजी : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत होणारा फायदा लक्षात घेऊनच राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासह इतर मतदारसंघांतील भाजप उमेदवाराच्या विजयासाठी फायदा होऊ शकेल, अशा आमदारांची मंत्रिपदी वर्णी लावण्याचे आणि निवडून येण्याची शक्यता नसलेल्यांना डच्चू देण्याचे भाजपने निश्चित केले असल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी शनिवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या सहा महिन्यांत काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपात आले. तेव्हापासून राज्यात सातत्याने मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेस आमदारांच्या प्रवेशानंतर केवळ एकदाच लोकसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांना वगळून त्यांच्याजागी आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यसभा खासदार तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी वारंवार मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत दिले. पण, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि सणांची कारणे देत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
काहीच दिवसांपूर्वी सभापती रमेश तवडकर यांनी या विषयाला हात घातला. पंधरा दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शिवाय मंत्रिपदासाठी आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो आणि संकल्प आमोणकर यांच्या नावांचा विचार होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. सभापतींच्या या वक्तव्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा जोर चढला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांशी मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात गुप्त बैठका घेतल्या.
दरम्यान, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ मार्चला संपणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळात फेरबदलासह मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होणार आहे. परंतु, हे बदल करताना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून येण्यासह त्यांचा इतरांनाही फायदा होऊ शकेल, अशांना संधी देण्याचे भाजपने निश्चित केले आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या एका पथकाने राज्यभर दौरा करून आणि स्थानिकांशी चर्चा करून मंत्री, आमदारांच्या कामांचा आढावा घेत, त्याबाबतचा अहवाल केंद्रीय नेत्यांना पाठवला आहे. या अहवालाचा अभ्यास करून मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
काही मंत्र्यांच्या खात्यांतही होणार बदल
विद्यमान मंत्रिमंडळातील तीन निष्क्रिय मंत्र्यांना वगळून इतर तीन आमदारांना मंत्रिपद देण्याचे भाजपने सद्यस्थितीत निश्चित केले आहे. या तीन आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागताच तत्काळ काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. अति महत्त्वाची अनेक खाती ज्या मंत्र्यांकडे आहेत, त्यांच्याकडील काही खाती मंत्रिमंडळात नव्याने दाखल होणाऱ्या मंत्र्यांना देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.