दोन बायकांच्या नात्यात कदाचित जास्त खाचखळगे असतील पण त्यांच्यातच हे खाचखळगे सहजपणे लिंपून घेता येईल असे काहीतरी रसायन असते हेही तितकेच खरे. मतभेद, चिडचिड प्रसंगी भांडणदेखील विसरून बायका एकमेकींना साथ द्यायला उभ्या राहतात तेव्हा या अनोख्या रसायनाची प्रचिती येते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच अशा कार्यक्रमांची निमंत्रणे पाठवणे सुरू होते. महिलांबद्दल अतिशय हळवे लेख व्हॉट्सअॅपवर, फेसबुकवर यायला सुरुवात होते. काही कविता आणि चित्रे तर दरवर्षीची ठरलेली. या वर्षी अनेक लघुपट बघत असल्याने, मला तर चक्क या विषयावरच्या लघुपटांची यादीच युट्यूबने दाखवली. त्यात अगदी कालच प्रदर्शित झालेला एक लघुपट होता - जरा सी धूप. मला प्रथम आकर्षित केले ते या सुंदर नावाने ! थोडेसे ऊन किती गरजेचे असते, नाही? याची प्रकर्षाने जाणीव होते ती पावसाळ्याच्या अंधाऱ्या, कुंद दिवसांमध्ये जेव्हा एखादा दिवस उघडीप असते तेव्हा! पण एप्रिल, मेच्या महिन्यांत हेच ऊन जेव्हा लख्ख, प्रखर असते तेव्हा ते त्रासदायक होते. अर्थातच अंधार आणि ऊन ही प्रतीके केवळ आपली मनस्थिती दर्शवत असतात. म्हणूनच सध्या सूर्य आग ओकत असतानाही लघुपटाचे शीर्षक वाचून मला मात्र पावसाळी दिवसात अवचित पडलेले मऊ मऊ ऊन जाणवले आणि उबदार वाटले आणि मी लगेच हा ‘वुमन्स डे स्पेशल’ लघुपट बघायला घेतला.
विषय फार वेगळा नसला, तरी अगदी नेहमीचाही नव्हता. आजारी आई आणि तिची सेवा, सुश्रुषा करताना आपल्या आवडीनिवडींना मुरड घालणारी, त्यापायी करिअरला कमी महत्त्व देणारी मुलगी आणि त्यांच्या घरात आईला सोबत म्हणून काम करणारी बाई... अशा तीन महिलांभोवती ही गोष्ट फिरते. एकत्र राहणाऱ्या कोणत्याही दोन व्यक्तींचे पटणे अवघडच. मागे मी एकेठिकाणी वाचले होते की, सासू-सुनेच्या नात्यासंबंधी नेहमी बोलले जाते पण एकत्र राहणाऱ्या आई आणि मुलगी या ही गुण्यागोविंदाने राहत नसतातच. मला वाटले किती खरे आहे, एकत्र राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये काहीतरी खटके उडणारच की! खरे तर तसे झाले नाही तरच नवल. तशाच या मायलेकींमध्ये खटका उडतो आणि मग तो कसा शांत होतो याची ही म्हटले तर अगदी साधी, सरळ गोष्ट महिला दिनाच्या किंवा मातृदिनाच्या निमित्ताने आवर्जून एकमेकींना पाठवली जाईल अशा पठडीतली.
या संदर्भात विचार करताना एक गोष्ट मात्र जाणवली, ती म्हणजे बायका जितक्या पटकन चिडतात, रागावतात तितक्या पटकन शांतही होतात. झालेली एखादी चुकीची गोष्ट, घडलेली चूक कदाचित दहा वेळा उगाळून काढतीलही पण वेळ पडली तर सगळे सोडून खंबीरपणे साथ निभावताना भूतकाळातल्या चुका आणि गैरसमज आड येऊ देणार नाहीत.
उदाहरण द्यायचेच झाले, तर आपण एक अगदी नेहमी ऐकले, बोलले, लिहिले जाणारे वाक्य बघू या... ‘बायकाच बायकांच्या शत्रू असतात..’ जुन्या कथा-कादंबऱ्या, सिनेमे ते अगदी कालपरवाच्या फेसबुक पोस्ट! सगळ्यांतून हे वाक्य बऱ्याचदा आलेले आहे, येत असते. कदाचित काही बाबतीत किंवा काही जणींच्या बाबतीत हे खरे असेलही पण म्हणून हे वैश्विक वगैरे म्हणावे असे वाक्य आजिबातच नाही. बऱ्याचदा असे होते की एखादी गोष्ट ऐकून-ऐकून नकळतपणे आपल्या मनावर बिंबवली जाते आणि मग आपण स्वतंत्रपणे विचार न करता ती गोष्ट सत्यच आहे असे मानून बसतो. आपले आचारविचार मग त्याप्रमाणे आपोआप बदलत जातात आणि एका पूर्वग्रहदूषित नजरेतूनच आपण काही माणसांना, घटनांना बघत जातो. या वाक्याच्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे असे वाटते. शितावरून भाताची परीक्षा नको असे म्हणतात ना?
याच लघुपटाच्या संदर्भात बोलायचे म्हटले, तर अंथरुणाला अगदी खिळलेली अशी नसली तरीही सर्व गोष्टींसाठी मुलीवर अवलंबून असणारी ही आई मुलीला समजून घेत नाही असे वरवर बघता वाटते. आईचे परिस्थितीवर काहीच नियंत्रण नाही हे आपल्यालाही कळत असते तरीही ती तिच्या वागण्याने मुलीवर अधिक भार घालत असते, मग ते नकळतपणे का होईना! पण म्हणून ती मुलीची शत्रू असते का? ती मुलीच्या यशाच्या आड येत असेलही कदाचित पण त्याला कारणीभूत ती स्वतः नाही तर तिची परिस्थिती असते हे जेव्हा आपल्याला आणि मुख्य म्हणजे मुलीला समजते तेव्हा पाऊस पडून गेल्यावर ऊन पडले की स्वच्छ, मोकळे वाटते तसेच काहीसे वाटले आणि शीर्षक, लघुपट यातून कदाचित हेच अभिप्रेत असेल असे जाणवले. मग यानंतर सगळे सुरळीत होणार असते का? तर नाही, अवघड असते ते अवघडच राहणार असते पण ते निभावताना, मतभेद झाले, भांडणे झाली तरी एकमेकींची साथ मिळणार असते.
वरवर बघता नाती फार फसवी वाटतात. ते नाते प्रत्यक्ष निभावत असलेल्या व्यक्तींनाच त्यातले खाचखळगे, चढउतार ठाऊक असतात. दोन बायकांमध्ये कधीही एकमत होत नाही, बायका बायका असतात तिथे वाद ठरलेलेच असे अनेक विनोद अस्तित्वात आहेत. कदाचित तसे असेलही. दोन बायकांच्या नात्यात कदाचित जास्त खाचखळगे असतील पण त्यांच्यातच हे खाचखळगे सहजपणे लिंपून घेता येईल असे काहीतरी रसायन असते हेही तितकेच खरे. मतभेद, चिडचिड प्रसंगी भांडणदेखील विसरून बायका एकमेकींना साथ द्यायला उभ्या राहतात तेव्हा या अनोख्या रसायनाची प्रचिती येते.
म्हणूनच अशा विधानांना खरे न मानता, अशा विनोदांचा भाग न होता आपल्याला, महिलांनाच हे खोडून टाकता यायला हवे आणि तेही जरासाही ओरखडा न उमटू देता हे या लघुपटाच्या निमित्ताने जाणवले आणि महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगावेसे वाटले!