म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील एका माजी नगराध्यक्षांचा बंद बंगला फोडून चोरांनी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. ही घरफोडी शुक्रवारी (४ सप्टेंबर) मध्यरात्री घडली असून, रविवारी (६ सप्टेंबर) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या चोरीमागे तोंडावर मास्क बांधलेल्या पाच जणांच्या टोळीचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी नगराध्यक्षांचे कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद होते. रविवारी सकाळी घरकाम करणारी महिला कामावर आली असता, बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा आणि कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. तिने तत्काळ शेजाऱ्यांना व म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता घरातील कपाटे फोडलेली आणि सामान अस्ताव्यस्त पसरलेले आढळले. कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लांबवला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री या टोळीने म्हापसा शहरात मोठा धुमाकूळ घातला होता. म्हापसा बाजारपेठेतील ११ दुकाने आणि गणेशपुरी येथील एका फ्लॅटवरही याच टोळीने डल्ला मारल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरांची ही संपूर्ण हालचाल बंगल्यातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या टोळीने परिसरातील इतर बंद घरांनाही लक्ष्य केले असावे, असा अंदाज वर्तवला जात असून म्हापसा पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.


