पणजी: नवीन भाजप भवनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आणि समाजबांधवांनी भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला दिल्लीत कधी नेणार आणि आमच्या या महत्त्वाच्या विषयावर केंद्र सरकारकडे कधी पाठपुरावा करणार? असा थेट सवाल करत धनगर बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक घडवून आणण्याच्या आश्वासनाचा पाठपुरावा करताना, या महिन्याभरातच ही भेट घडवून आणणार का, असा जाब विचारत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शांत न बसण्याचा इशारा प्रतिनिधींनी दिला.
या घडामोडींनंतर धनगर समाजाचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. गेल्या २३ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा सुरू असून, याबाबतची आरजीआय (Registrar General of India) चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे कवळेकर यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. माजी उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी नेहमीच धनगर समाजाच्या मागण्यांचे कौतुक केले असून, त्यांना एसटी दर्जा मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना त्यांचा कायम सहकार्य आणि पाठिंबा राहिला आहे.
धनगर समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या समस्या आणि भावना चांगल्या प्रकारे समजून घेतल्याचे सांगत, या प्रकरणावर योग्य तो तोडगा काढण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. या प्रलंबित विषयावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय सकारात्मक पावले उचलेल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. भाजप नेत्यांनीही वरिष्ठ पातळीवर चर्चा करत लवकरच दिल्लीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन धनगर प्रतिनिधींना दिले. भाजप भवन उद्घाटनाच्या निमित्ताने गोव्यातील धनगर समाजाने आपल्या आरक्षणाचा २३ वर्षांचा प्रश्न पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला आहे.


