पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून आरोप असलेले जेनिटो कार्दोज यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात त्याच्याविरोधातील आरोप निश्चित करण्याच्या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी न्यायालयात आज शुक्रवारी सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
कार्दोज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आरोप निश्चित करण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. जेनिटोने याप्रकरणी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील सुनावणी २४ सप्टेंबरला : ॲड. विभव आमोणकर
जेनिटोच्या आव्हान याचिकेवर माहिती देताना त्याचे वकील ॲड.. विभव आमोणकर यांनी सांगितले की, त्याच्याविरोधातील आरोप निश्चितीच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार असल्याने ७ सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयात असलेली सुनावणी पुढे तहकूब करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
मारहाण करण्यात सहा जणांचा समावेश
दरम्यान, १८ सप्टेंबर २०२५ रोजी रामा काणकोणकर करंझाळे येथे मित्रासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी काहीजणांनी त्यांना रोखून केबल, चैन यांनी जबर मारहाण केली होती. त्याचबरोबर गायीचे शेणही फासले होते. याप्रकरणी पणजी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोजसहीत सहाजणांना अटक केली होती. त्यात अॅंथनी नडार, फ्रांसिस नडार, मिंगेल आरावजो, मनिश हडफडकर, सुरेश नाईक यांचा समावेश होता.


