दरमहा १५,०००/- रुपये अशा ठराविक इंटर्नशिप भत्त्यावर (Stipend), केवळ एका वर्षाच्या कालावधीसाठी 'इंटर्न समुपदेशक' (Intern Counselor) ही पदे भरली जातील.

पणजी: महिला व बालविकास खात्याने इंटर्नशिप योजनेअंतर्गत अर्ज मागवले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना राज्यातील 'अपना घर', महिला संरक्षण गृह, बाल कल्याण समित्या, बाल न्याय मंडळे आणि पीडित सहाय्य कक्ष (व्हिक्टिम असिस्टन्स सेल) येथे काम करण्याची संधी मिळेल, अशी माहिती महिला व बालविकास विभागाने जारी केली आहे.
खात्याने समुपदेशन (कौन्सिलिंग), मानसशास्त्र, समाजकार्य, गृहविज्ञान यांसारख्या शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप योजना अधिसूचित केली आहे. या योजनेसाठी आवश्यक पात्रता म्हणून उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाज सेवा, सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र, गृहविज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी (Post Graduation) किंवा समुपदेशन शाखेतील पदव्युत्तर पदविका (Post Graduate Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यापूर्वी, जास्तीत जास्त तीन वर्षांच्या आत आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराला अंतिम वर्षात एकूण किमान ५०% गुण मिळालेले असणे बंधनकारक आहे.
खाते दरमहा १५,०००/- रुपये अशा ठराविक इंटर्नशिप भत्त्यावर (Stipend), केवळ एका वर्षाच्या कालावधीसाठी 'इंटर्न समुपदेशक' (Intern Counselor) ही पदे भरणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जाची हार्ड कॉपी आवश्यक कागदपत्रांसह पणजी येथील महिला व बालविकास संचालनालयाच्या कार्यालयात २५ जून ते २४ जुलै या कालावधीत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत सादर करावी, अशी सूचना विभागाने दिली आहे.