कधीही न झालेल्या लाकूड आयातीचे बनावट दस्तऐवज दाखवून पैसे परदेशात वळवले. बँक व्यवस्थापकाचाही सहभाग उघड.

पणजी : 'महेश टिंबर प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीशी संबंधित तब्बल १५५.२१ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपला मोर्चा पुन्हा एकदा गोव्याकडे वळवला आहे. 'ईडी'च्या चंदीगड विभागीय कार्यालयाने मंगळवारी मोठी कारवाई करत गोव्यातील पणजीसह हरियाणातील करनाल आणि दिल्लीतील एकूण ११ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. ही कारवाई आम आदमी पार्टीचे (AAP) गोवा प्रभारी आणि नेते दीपक सिंगला, त्यांचे बंधू रमण सिंघला आणि त्यांचे मामा अशोक मित्तल यांच्याशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजलेली असून हा केवळ एक बँक गैरव्यवहार नसून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर रचलेला एक पूर्वनियोजित गुन्हेगारी कट असल्याचे तपासात समोर येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याच्या आधारे 'ईडी'ने हा मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपक सिंगला, रमण सिंघल आणि त्यांचे मामा अशोक कुमार मित्तल यांनी भारत आणि सिंगापूरमध्ये एकमेकांशी जोडलेल्या बोगस कंपन्यांचे एक मोठे जाळे निर्माण केले होते.
या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि इतर संबंधित बँकांच्या समूहाला तब्बल १५५ कोटी रुपयांहून अधिकचा गंडा घातला. बँकांकडून सुरुवातीला 'महेश टिंबर' कंपनीसाठी केवळ २१.४८ कोटी रुपयांचे 'फॉरेन लेटर ऑफ क्रेडिट' (परदेशी पतपत्र) मंजूर करण्यात आले होते. मात्र,संशयितांनी अत्यंत चलाखीने बनावट कागदपत्रे, बनावट करार आणि खोटे 'बिल ऑफ लेडिंग' सादर करून बँकांची दिशाभूल केली आणि ही मर्यादा तब्बल १७३.०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवून घेतली.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे संशयितांनी ज्या लाकडाच्या (टिंबर) आयातीचे कारण दाखवून बँकांकडून कोट्यवधी रुपये परदेशात वळवले, ती लाकडाची आयात प्रत्यक्षात कधी झालीच नव्हती. केवळ कागदावरच हा संपूर्ण व्यापार दाखवण्यात आला होता. केंद्रीय सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर मंडळाने केलेल्या पडताळणीत असे स्पष्ट झाले आहे की, संशयितांनी बँकेत जमा केलेली बहुतांश आयात कागदपत्रे पूर्णपणे बनावट, बनावट स्वाक्षऱ्या असलेली आणि बनावट शिक्के मारून तयार केलेली होती.
या व्यवहारासाठी बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाने देखील सिंगापूरमध्ये स्थायिक होण्याच्या आमिषाला बळी पडून संशयितांना अमर्याद मदत केल्याचा संशय आहे. 'ईडी'ने यापूर्वी मे महिन्यात दीपक सिंघला यांना अटक केली होती, तर अशोक मित्तल यांना २०२२ मध्येच अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ११.५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असली, तरी घोटाळ्यातील मोठा हिस्सा अद्यापही हाती लागलेला नाही. या ताज्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड, परदेशी चलन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून, त्यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.