लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलाच्या जन्मानंतर जबाबदारीही झटकली

फसवणूक केल्याप्रकरणी फोंड्यातील संशयितावर गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
28 mins ago
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; मुलाच्या जन्मानंतर जबाबदारीही झटकली

मडगाव : लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका युवतीला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास भाग पाडत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेची दीड लाख रुपयांची आर्थिक फसवणूकही करण्यात आली आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोलवा पोलिसांनी संशयित रमेश चनबसप्पा हडपद (वय वर्षे नमूद नाही, रा. खाडपाबांध, फोंडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रमेश हडपद याने २०२४ मध्ये कोलवा येथील रहिवासी असलेल्या युवतीशी मैत्री केली. संशयिताने आपण अविवाहित असल्याचे खोटे सांगून प्रथम त्या युवतीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला स्वतःसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास प्रवृत्त केले.

संशयिताने २०२४ पासून १५ जून २०२६ या कालावधीत कोलवा येथील 'स्टार बीच रिसॉर्ट' आणि इतर विविध ठिकाणी युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान पीडित युवती गरोदर राहिली. मात्र, गरोदरपणाच्या काळात संशयिताने तिला सांभाळण्याऐवजी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला, तसेच तिला वारंवार शिवीगाळ केली. या काळात त्याने लग्नाचा बहाणा करून पीडितेकडून दीड लाख रुपयांची रक्कमही उकळली.

पीडित युवतीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर संशयिताचे वर्तन आणखी क्रूर झाले. त्याने पीडितेला मारहाण केली आणि नवजात मुलाची व तिची कोणतीही जबाबदारी घेण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर संशयित पीडित महिला आणि नवजात बालकाला बेवारस सोडून घटनास्थळावरून पसार झाला. या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर कोलवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी लग्नाचे खोटे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवणे, मारहाण करून दुखापत करणे, आर्थिक फसवणूक करणे आणि धमकी देणे या कलमांखाली संशयितावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा