'नीट' फेरपरीक्षेच्या तणावातून डेहराडूनमध्ये २३ वर्षीय मुलीची आत्महत्या

डॉक्टर बनण्याचे स्वप्न अधुरे.

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
23 mins ago
'नीट' फेरपरीक्षेच्या तणावातून डेहराडूनमध्ये २३ वर्षीय मुलीची आत्महत्या

डेहराडून :  'नीट' फेरपरीक्षेच्या वाढत्या तणावातून आणखी एका विद्यार्थिनीने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरखंडची राजधानी डेहराडूनमध्ये २३ वर्षीय रिया कुमारी थापा हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रिया ही कारगील युद्धात शौर्य गाजवलेले माजी सैनिक राजेश थापा यांची मुलगी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पटेल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रमणी कॉलनीत ही घटना घडली. २१ जून रोजी होणाऱ्या आगामी 'री-नीट' परीक्षेची रिया तयारी करत होती. नेहमीप्रमाणे ती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची आणि सकाळी उशिरा उठायची. मात्र, मंगळवारी दुपारी बराच वेळ झाली तरी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. कुटुंबीयांनी आत पाहिले असता रिया पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपास पथकाला खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये रियाने आपल्या पालकांसाठी मम्मी-पप्पा, आय लव्ह यू, असा अत्यंत भावुक संदेश लिहिला होता.

दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, रियाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते आणि ती बऱ्याच काळापासून 'नीट' परीक्षेची तयारी करत होती. मात्र, मागील प्रयत्नांमध्ये यश न आल्याने आणि आगामी परीक्षेच्या वाढत्या मानसिक दडपणामुळे ती प्रचंड तणावाखाली आणि निराश होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तपास यंत्रणा सुसाईड नोट व इतर पुराव्यांची तपासणी करत आहेत. 

हेही वाचा