
फाळणीच्या काळातील वेदना, संघर्ष आणि मानवी भावनांचा प्रवास मोठ्या पडद्यावर मांडणारा बहुप्रतिक्षित ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या या भव्य चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट चालू वर्षी म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटातील प्रमुख पात्रांचे फर्स्ट लुक पोस्टर्स देखील सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहेत.
निर्मात्यांनी आमिर खान प्रोडक्शन्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील पात्रांची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. या पोस्टर्समध्ये पात्रांच्या चेहऱ्यावर दुःख, भीती आणि विस्कळीत झालेल्या जगाची वेदना स्पष्टपणे जाणवते. मात्र, त्याच वेळी त्यांच्या डोळ्यांतील शक्ती, निरागसता आणि आशाही अधोरेखित करण्यात आली आहे.
‘विस्कळीत झालेल्या जगात, त्यांची कहाणी धैर्याचा एक उत्तम दाखला होती. हे सर्व अनुभवलेल्या लोकांना भेटा... ‘बटवारा १९४७’, १४ ऑगस्टपासून थिएटरमध्ये!’
या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. यामध्ये सनी देओल (सिकंदर मिर्झा), शबाना आझमी (दुर्गावती देवी, माई), प्रीती झिंटा (हमीदा बेगम), करण देओल (जावेद मिर्झा), अली फझल (हबीब अन्वर), अभिमन्यू सिंह (याकूब खान) यांच्या भूमिका आहेत.
फाळणीच्या कठीण आणि अत्यंत संवेदनशील काळातही ज्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही आणि आपली मातृभूमी तसेच मानवतेप्रती असलेले धैर्य टिकवून ठेवले, अशा लोकांची ही कथा असणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर चित्रपटाला ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांचे संगीत लाभले असून, दर्जेदार गाण्यांचे शब्द प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला रिलीज होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करणार, याकडे आता संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.