सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांचा इशारा

मडगाव : आवश्यक परवानग्या न घेता रस्त्यांचे खोदकाम करणाऱ्या कोणत्याही एजन्सी किंवा विभागाविरुद्ध थेट एफआयआर नोंदवण्यासह कडक कारवाई केली जाईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री दिगंबर कामत यांनी दिला.
मडगावात पत्रकारांशी बोलताना कामत म्हणाले की, रस्त्यांच्या अंदाधुंद खोदकामामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होतो आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान होते. सरकार हे अजिबात खपवून घेणार नाही.
विद्युत विभाग असो किंवा इतर कोणतीही एजन्सी, जर परवानगीशिवाय रस्ते खोदले गेले, तर एफआयआर नोंदवला जाईल. या मुद्द्यावर विभाग कोणतीही तडजोड करणार नाही, असे कामत यांनी स्पष्ट केले. रस्ते खोदण्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच कामे सुरू व्हावीत यासाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती विविध विभागांमध्ये समन्वय साधून अनावश्यक खोदकाम रोखणार आहे आणि रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती सुनिश्चित करेल. पावसाळ्यापूर्वी राज्यातील बहुतांश प्रमुख रस्त्यांचे हॉट-मिक्सिंगचे काम पूर्ण झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. अंतर्गत रस्त्यांची उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, नागरिकांना पाणी साचणे, रस्ते खराब होणे किंवा ड्रेनेजची समस्या आढळल्यास, त्यांनी त्वरित माझ्याशी किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री कामत यांनी केले.
पीडब्ल्यूडी अभियंत्यांना सतर्कतेचे आदेश
पावसाळ्यात पाणी साचणे आणि निचरा होण्याशी संबंधित समस्यांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना संपूर्ण गोव्यातील पीडब्ल्यूडी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व अभियंत्यांना संवेदनशील ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.