जोयडातील अपुऱ्या आरोग्यसेवेमुळे गर्भवती महिलेने गमावला जीव

तालुकावासीयांत संताप : गेल्या तीन वर्षांतील तिसरी घटना

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
10th December, 06:27 pm
जोयडातील अपुऱ्या आरोग्यसेवेमुळे गर्भवती महिलेने गमावला जीव

जोयडा : आरोग्य यंत्रणेतील दुर्लक्ष आणि सुविधांच्या अभावाने जोयडा तालुक्यात पुन्हा एका महिलेचा बळी गेला आहे. जगलबेट येथील रोहिणी हणबर आणि तिच्या पोटच्या बाळाचा मृत्यू होताच, तालुक्यातील अपुऱ्या आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  त्यामुळे “सरकार असे किती बळी घेणार?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रामनगर भागात गेल्या तीन वर्षांत गर्भवती महिला व त्यांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. तालुक्यात आरोग्य सेवेसाठी मोठमोठ्या इमारती बांधल्या असल्या तरी डॉक्टरांची आणि अत्याधुनिक सुविधांची कमतरता असल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यामुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागत आहे.

रोहिणी हणबर हिला जगलबेट येथून दांडेली येथे उपचारासाठी नेताना रस्त्यावरील मोठ्या खड्ड्याचा सामना करावा लागला. त्यानंतर दांडेली आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथेही वेळेवर उपचार मिळाले नाहीत, उलट सकाळी डॉक्टरांनी तिला उपचारासाठी धारवाडला पाठविले. मात्र, वाटेतच तिचा मृत्यू झाला. तिला आरोग्य केंद्रात दाखल केले तेव्हाच डॉक्टरांनी तपासणी करून वेळेवर उपचार केले असते किंवा योग्य सल्ला दिला असता तर रोहिणीचा जीव वाचला असता, असा आरोप पती मनोज हणबर व नातेवाईकांनी केला आहे.

हळीयाळ येथे वाटेतच तिचा मृत्यू झाल्यानंतर शवचिकित्सा करण्यासाठी मृतदेह कारवार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथे शवचिकित्सा केल्यानंतर बुधवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बुधवारी दुपारी तिच्यावर जगलबेट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, दांडेली येथील डॉक्टरांनी रोहिणी हिचा मृत्यू प्रसुतीच्या कारणांमुळे झाला नसल्याचा दावा केला आहे.

जोयडाच्या आरोग्य यंत्रणेतील वनवास कधी संपणार?

जोयडा तालुक्यात रामनगर आणि जोयडा येथे मोठी सरकारी आरोग्य केंद्रे आहेत. परंतु, येथे आवश्यक साधन सुविधा, डॉक्टर नाहीत. सरकारी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने येथील रुग्ण उपचारासाठी बेळगाव, बांबोळी, हुबळी - धारवाडला जात आहेत. मात्र, त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. परंतु येथील लोकांचे दु:ख राजकर्ते, समाजसेवकांना कधीच दिसले नाही. त्यांना लोकांचे प्रश्न, समस्या कधीच मांडाव्यासा वाटल्या नाहीत. ही दुर्दैवी स्थिती तालुक्याची आहे.

आतातरी आमदार साहेब लक्ष देणार का?

काही महिन्यांपूर्वी एका महिला पत्रकाराने स्थानिक आमदार आर. व्ही. देशपांडे यांना रस्त्यावरील खड्डे आणि गर्भावती महिलांना या रस्त्यावरून प्रवास करताना होणाऱ्या वेदनांविषयी विचारले होते. त्याच मतदारसंघात रोहिणी आणि तिच्या बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आतातरी आमदार या विषयावर लक्ष घालणार का? असा सवाल स्थानिक लोकांकडून विचारला जात आहे.


हेही वाचा