दोन वर्षांत आढळले ५,२१८ रुग्ण : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून माहिती उघड

पणजी : गेल्या काही वर्षांत गोव्यातील कर्करोगा (Cancer) च्या रुग्णांत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात २०२२ ते २०२४ दरम्यान कर्करोगाचे ५,२१८ रुग्ण आढळले होते. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १४५, तर दिवसाला सरासरी ४ रुग्ण आढळले होते. दोन वर्षांत कर्करोगी रुग्णांची संख्या ४.८८ टक्क्यांनी वाढली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataparao Jadhav) यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार नीरज शेखर (Neeraj Shekhar) यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात २०२२ मध्ये कर्करोगाचे १७०० रुग्ण आढळले होते. २०२३ मध्ये १,७३५ रुग्ण आढळले. तर २०२४ मध्ये ही संख्या वाढून १,७८३ झाली. वरील कालावधीत संपूर्ण देशात कर्करोगाचे ४४.९१ लाख रुग्ण आढळले होते. म्हणजेच महिन्याला सरासरी १.२४ लाख तर दिवसाला सरासरी ४१ हजार रुग्ण आढळले. २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये देशातील कर्करोगींची संख्या ४.९० टक्क्यांनी वाढली. वरील कालावधीत उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक ६.४६ लाख कर्करोगाचे रुग्ण आढळले होते.
यानंतर महाराष्ट्रात ३.७२ लाख, पश्चिम बंगालमध्ये ३.४७ लाख, तर बिहारमध्ये ३.२६ लाख रुग्ण आढळले होते. वरील कालावधीत सिक्कीम येथे सर्वात कमी म्हणजेच १५८२ रुग्ण आढळले होते. मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय येथे रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती. केंद्र शासित प्रदेशात दिल्ली येथे सर्वाधिक ८२ हजार ६८३ रुग्ण आढळले होते. तर लक्षद्वीप येथे सर्वात कमी म्हणजेच ९१ रुग्ण आढळल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
केंद्र सरकारच्या विविध संस्था कर्करोगावर संशोधन करत आहेत. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण प्रकल्पांतर्गत केंद्रातर्फे सर्व राज्य सरकारना तांत्रिक आणि आर्थिक मदत केली जाते. यानुसार देशभरात ७७० जिल्हा रुग्णालये उभारण्यात आली आहेत. तसेच किमोथेरेपी घेतलेले रुग्णांसाठी ३६४ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिर योजनेंतर्गत निरोगी आयुष्याचा पुरस्कार करण्यात येत आहे. देशभरातील जन औषधी केंद्रात कर्करोगावरील औषधे ५० ते ८० टक्के कमी दरात उपलब्ध करून दिली असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
मधुमेहींच्या संख्येत एका वर्षात ८ टक्क्यांनी वाढ
राज्यसभेतील अन्य एका प्रश्नाच्या उत्तरातून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात दोन वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या ८.१७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२३-२४ मध्ये तपासणी केलेल्या ६६ हजार ९०८ रुग्णांपैकी १३ हजार ४७५ जणांना (२०.१३ टक्के) मधुमेह होता. २०२४- २५ मध्ये ८१ हजार ९०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यातील २३ हजार १८६ जणांना (२८.३० टक्के) मधुमेह होता.