शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजासाठी मिळणार ४ टक्के अनुदान : कृषी खात्याची योजना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
48 mins ago
शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजासाठी मिळणार ४ टक्के अनुदान : कृषी खात्याची योजना

पणजी : गोव्यातील (Goa) शेतकऱ्यांवरील (Farmers) कर्जाचा भार कमी करणे, व्याज अनुदान देऊन अधिकाधिक लोकांना शेतीकडे (Agriculture) आकर्षित करणे; यासाठी कृषी खात्याने (Agriculture Department Goa) शेतकऱ्यांसाठी व्याज अनुदान योजना जाहीर केली आहे.

यानुसार शेतकऱ्यांना त्यांनी काढलेल्या लघु आणि दीर्घ काळाच्या अनुक्रमे ३ व ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजासाठी ४ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. वेळेत कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.  योजनेचा कालावधी ३१ मार्च २०२८ पर्यंत असणार आहे.

कृषी खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही योजना सर्व शेड्युल बँका, लघु वित्तीय बँका, गोवा सहकारी बँक तसेच प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स) यातून घेतलेल्या कर्जासाठी ही योजना लागू असणार आहे. योजनेचा लाभ शेतकऱ्यांसह, पशु संवर्धन, मच्छीमारांना देखील घेता येणार आहे.

५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा कमाल कालावधी ५ वर्षे असणे आवश्यक आहे. कर्जदाराने सर्व हप्ते वेळेत फेडले आणि अन्य अटी पूर्ण केल्यास सरकार कमाल ५ वर्षांपर्यंत व्याज अनुदान देणार आहे. योजनेचा लाभ घेण्याबाबत वित्तीय संस्थांच्या प्रमुखांनी दर सहा महिन्यांनी कृषी खात्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

लघु कर्जामध्ये बियाणे, खते, सिंचन, किड नाशक, कामगार, कापणी, मार्केटिंग आदी खर्चांचा समावेश असेल. पशु संवर्धन विभागात जनावरांसाठी चारा, खाद्य, वैद्यकीय उपचार, वीज आणि पाणी बिल यांचा समावेश आहे.

तर मच्छीमार विभागात इंधन, कामगार, लोडिंग शुल्काचा समावेश आहे. दीर्घकालीन कर्जामध्ये जमीन विकास कुंपण घालणे आधी गोष्टींचा समावेश आहे. यातील पशुसंवर्धन आणि मच्छीमार कर्जाबाबतच्या अटी या संबंधित खाते तयार करणार आहेत. योजनेवर जिल्हा तसेच विभागीय कृषी अधिकारी देखरेख ठेवणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.


हेही वाचा