
पणजी : दोडामार्ग (Dodamarg) येथील नाक्यावर पर्यटकांकडून पावती न देता पैसे घेणाऱ्या तीन पोलिसांवर (Goa Police) कारवाई करावी अशी मागणी ॲड. संतोष मळवीकर यांनी केली. गुरुवारी त्यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. तत्पूर्वी त्यांनी पैसे घेणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली.
या नाक्यावरील पोलीस पर्यटकांना लुबाडत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. नुकताच या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
मळवीकर यांनी सांगितले की, रविवारी दुपारी आम्ही दोडामार्ग येथून गोव्यात प्रवेश केला असता नाक्यावरील असणाऱ्या पोलिसांनी आम्हाला अडवले.
माझ्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे होती, मात्र, वाहन परवाना नव्हता. मी माझी चूक मान्य करून दंड भरण्याचे ठरवले. पोलिसांनी माझ्याकडून पाचशे रुपये घेतले. मात्र, पावती मागितली असता ती मिळणार नाही असे सांगण्यात आले. या पोलिसांनी नेमप्लेट देखील लावली नव्हती.
त्याच दिवशी रात्री आठ वाजता या मार्गाने आम्ही गोव्यातून बाहेर पडत होतो. त्यावेळी पोलिसांनी कर्नाटकचे एक वाहन अडवले. वाहनांमधील व्यक्तींना मारहाण देखील करण्यात आली. या दोन्ही घटना आम्ही रेकॉर्ड केल्या आहेत.
आम्ही ते पणजी पोलिसांना पुरावे म्हणून देणार आहोत. गोवा पोलिसांनी अशा पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे. गोव्यातील विदेशी पर्यटक कमी होत आहेत. तर पोलिसांतर्फे देशी पर्यटकांनाही त्रास दिला जात आहे. असले प्रकार बंद झाले पाहिजेत असे मळवीकर यांनी सांगितले