मुरगाव कोमुनिदादच्या जमिनीत बांधकाम कचरा टाकल्याने याचिका

दक्षिण मध्य रेल्वे, रेल विकास निगमला उच्च न्यायालयाची नोटीस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
मुरगाव कोमुनिदादच्या जमिनीत बांधकाम कचरा टाकल्याने याचिका

पणजी : दक्षिण मध्य रेल्वे आणि रेल विकास निगम लिमिटेड मुरगाव कोमुनिदादच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त केलेल्या इमारतीचा बांधकाम कचरा टाकत आहेत. असा दावा करून कोमुनिदादने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे.

मुरगाव कोमुनिदादने उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यात दक्षिण मध्य रेल्वे आणि रेल विकास निगम लिमिटेड, नगरनियोजन खाते, मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरण (एमपीडीए), दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मुरगाव उपजिल्हाधिकारी, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (जीएसपीसीबी), मुरगाव नगरपालिका, वास्को पोलीस स्थानक, राज्य सरकार व इतरांना प्रतिवादी केले आहे.

दक्षिण मध्य रेल्वे आणि रेल विकास निगम लिमिटेड मुरगाव कोमुनिदादच्या मालमत्तेत जमीनदोस्त केलेल्या इमारतीचा बांधकाम कचरा टाकत आहेत. या संदर्भात संबंधित यंत्रणेकडे अनेकदा तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. असे असताना त्यावर कोणीच कारवाई करत नाही. तसेच वरील प्रतिवादी डबल-ट्रॅकिंग कामाचा विस्तार करताना इमारत व इतर बांधकाम जमीनदोस्त करत आहेत. त्यामुळे बांधकाम कचरा कोमुनिदादच्या जमिनीत टाकत आहेत. हे बंद करावे तसेच कोमुनिदादच्या मालमत्तेचे आणखी नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने डबल-ट्रॅकिंग कामांवर लक्ष ठेवण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश जारी करण्याची मागणी मुरगाव कोमुनिदादने केली आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस जारी करून पुढील सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली आहे.