अमली पदार्थ विरोधी पथकाने हरमल येथे केली होती कारवाई

पणजी : न्यायालयात सादर केलेल्या दस्तावेजांनुसार, गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संशयितांकडून जप्त केलेली सामग्री आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेने तपासलेली वस्तू या एकमेकांपासून भिन्न असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, तपासलेली वस्तू अमली पदार्थ कायद्यानुसार ‘गांजा’च्या व्याख्येत बसत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. या निरीक्षणाच्या आधारे मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी संशयित विकी यादव याची गांजा तस्करी प्रकरणातून सुटका करण्याचा आदेश दिला.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) १६ सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री १२.४५ ते पहाटे ३.१५ दरम्यान हरमल येथील एका विद्यालयाच्या फुटबॉल मैदानाजवळ सापळा रचला. त्यावेळी पथकाने विकी यादव (मूळ दिल्ली, रा. हरमल) या युवकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली होती. पथकाने त्याच्याकडून ३ लाख रुपये किमतीचा ३ किलो गांजा जप्त केला होता. चौकशीनंतर पथकाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणी पथकाने तपास पूर्ण करून २९ मे २०२३ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात याबाबत सुनावणी झाली असता, संशयित विकी यादवतर्फे अॅड. अभरीश गवंडलकर यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी संशयिताकडून जप्त केलेल्या वस्तू (dried green colour leafy substance) म्हणून एएनसीने नोंद केली आहे. तर न्यायवैद्यक प्रयोगशाळेने तपासलेल्या वस्तू (dried greenish color vegetative flowering and fruiting tops with seeds) अशी नोंद केली. त्यामुळे जप्त केलेली वस्तू आणि तपासलेली वस्तू वेगवेगळी असल्याचा दावा केला. तसेच जप्त केलेली वस्तू अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गांजाच्या व्याख्येत येत नाही. त्यामुळे संशयित विकी यादव याला आरोपातून सुटका करण्याची मागणी अॅड. गवंडलकर यांनी केली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित विकी यादव याला आरोपातून मुक्त केले.