राज्यात २२२ सराईत गुन्हेगार

सर्वाधिक २४ जण जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत


10th November, 11:53 pm
राज्यात २२२ सराईत गुन्हेगार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील काही दिवसांत खून, दरोडा, लैंगिक अत्याचार, तसेच इतर गुन्हेगारी कारवायांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशा व इतर घटनांची दखल घेऊन राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील सराईत गुन्हेगारांची यादी पाहिली असता, राज्यात २२२ सराईत/अट्टल गुन्हेगार आहे. त्यातील सर्वाधिक २४ जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत आहेत.
राज्यात खून, बलात्कार, दरोडा, महिलांशी संबंधित गुन्हे, गुन्हेगारी गटाचे सदस्य असणे किंवा विशेष पद्धतीने गुन्हे करणारे आणि दोन गुन्ह्यांहून अधिक गुन्ह्यांत पुन्हा पुन्हा सहभागी असलेल्या गुन्हेगारांची पोलीस ‘सराईत गुन्हेगार’ म्हणून नोंद करतात. या सराईत गुन्हेगारांना निवडणूक अथवा दंगल इत्यादी वेळी प्रतिबंधात्मक अटक केली जाते. नंतर त्यांना हमीवर सोडण्यात येते. त्यावेळी त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत ताकीद दिली जाते. निवडणुकीच्या वेळी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या काही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली जाते. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना अट्टल गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार, संबंधित पोलीस अधीक्षक ही यादी पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतात. त्यानंतर गुन्हेगारांची सुनावणी घेऊन त्यांना ताकीद दिली जाते.
करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी सांताक्रूझ येथील सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोझसह अँथनी नादार, फ्रान्सिस नादार, मिंगेल आरावजो, फ्रांको डिकॉस्टा, मनीष हडफडकर, साईराज गोवेकर आणि सुरेश नाईक यांना अटक करून कारवाई केली होती. या व इतर घटनांची दखल घेऊन पोलीस खात्याच्या शिफारशीनुसार, गृह खात्याच्या अवर सचिवांनी आदेश जारी करून तीन महिन्यांसाठी राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू केला आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना एनएसए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
राज्यातील सराईत गुन्हेगारांची यादी पाहिली असता, उत्तर गोव्यात १३२ तर दक्षिण गोव्यात ९० मिळून राज्यात एकूण २२२ सराईत गुन्हेगार आहेत. सर्वाधिक २४ सराईत गुन्हेगार जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत आहेत. त्यानंतर १९ कळंगूट, १७ म्हापसा, पणजी आणि मायणा कुडतरी प्रत्येकी १५, १४ हणजूण, मडगाव आणि वास्को प्रत्येकी १२, वेर्णा आणि पर्वरी प्रत्येकी ९, फोंडा आणि वाळपई प्रत्येकी ८, कोलवा ७, कुंकळ्ळी आणि डिचोली प्रत्येकी ६, फातोर्डा आणि साळगाव प्रत्येकी ५, कोलवाळ ४, केपे, काणकोण आणि मांद्रे प्रत्येकी ३, कुडचडे, मुरगाव, कुळे व आगशी प्रत्येकी २ तर सांगे आणि मोपा- विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत प्रत्येकी एक मिळून राज्यात २२२ सराईत गुन्हेगार आहेत.
सराईत गुन्हेगारांची जिल्हानिहाय संख्या
उत्तर गोवा : १३२
दक्षिण गोवा : ९०
....................
एकूण २२२
________________
पोलीस स्थानक हद्दीतील सराईत गुन्हेगारांची संख्या

हेही वाचा