हानीभरपाईसाठी कृषी खात्याकडे आठ हजारांहून अधिक अर्ज

कृषी संचालक : भरपाईची रक्कम वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

Story: गणेश जावडेकर |
09th November, 11:42 pm
हानीभरपाईसाठी कृषी खात्याकडे आठ हजारांहून अधिक अर्ज

गोवन वार्ता
पणजी : दिवाळीनंतर राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत नुकसानभरपाई मिळावी यासाठी कृषी खात्याकडे आतापर्यंत आठ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. दररोज विविध कार्यालयांकडे अर्ज येत आहेत. त्यामुळे अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली.
आता पाऊस जाऊन थंडी पडू लागली आहे. दिवाळीनंतर मात्र दहा दिवस राज्यातील सर्वच भागांत चांगलाच पाऊस पडला. त्यामुळे डिचोली, बार्देश, सत्तरी, सांगे, काणकोण या तालुक्यांत शेतांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत प्रतिहेक्टर ४० हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. जास्तीत जास्त ४ हेक्टरपर्यंत १ लाख ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळू शकते. प्रत्येक तालुक्यातून नुकसानभरपाईसाठी ६०० ते ७०० अर्ज आले आहेत. अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अर्जाप्रमाणे ३०० हेक्टरहून अधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. अर्जाप्रमाणे संबंधित विभागातील कृषी अधिकारी झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. पाहणीनंतरच नुकसान किती झाले याचा निश्चित आकडा समजणार आहे. विभागीय कृषी अधिकारी प्रथम आलेल्या अर्जाची प्रथम पाहणी करतील, असेही कृषी खात्याचे संचालक फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
पावसामुळे शेतीबरोबरच बागायतीचेही नुकसान झाले आहे. काही कुळागरातील माड पडले आहेत. पावसामुळे सुपारीचीही गळती झाली. यंदा मान्सून हंगामातील पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. सरासरीपेक्षा भाताचे पीक अधिक येण्याची अपेक्षा होती. मात्र दिवाळीच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने भाताची रोप आडवी केली. काही शेतकऱ्यांनी पीक कापून ठेवले होते. मात्र त्यात पावसाचे पाणी गेल्याने ते कुजले. पाऊस सुरूच राहिल्याने पिकांना आवश्यक थंडी पडलीच नाही. कणसे आलेले रोप आडवे झाल्यामुळे मशीनने कापणी अशक्य झाली. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्जासोबत नुकसान झालेल्या शेतांचा फोटो पाठवणे आवश्यक आहे.
डोंगराळ भागातील कापणी हातानेच करावी लागते. सपाट असलेल्या जमिनीतील कापणी मशीनने केली जाते. रोप आडवे झाल्यामुळे मशिनने कापणी करणे शक्य होणार नाही. कापणीसाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. यामुळे खर्च वाढणार आहे. आणलेल्या मशिनचा उपयोग झालाच नाही.
भरपाई वाढवण्याबाबत आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, प्रतिहेक्टर ४० हजार रुपयांची नुकसान भरपाई खूपच कमी आहे, अशी तक्रार काही शेतकरी करू लागले आहेत. नुकसान भरपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी काही आमदारांनी केली आहे. ‘शेतकरी आधार निधी’खाली दिली जाणारी भरपाईची रक्कम वाढवावी, अशी मागणी करणारे पत्र आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लिहिले आहे, असे आमदार अालेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.
काही आमदारांकडून हानीची प्रत्यक्ष पाहणी
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह काही आमदारांनी विभागीय कृषी अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. विभागीय कृषी कार्यालयांत भरपाईचे अर्ज उपलब्ध केले. विभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार नुकसानभरपाई मिळणार आहे.

हेही वाचा