मुंबईत कर्नलच्या घरात चोरी; दागिने विकून गोव्यात केली मौजमजा

तिघांना अटक : एका अल्पवयीनाचा समावेश

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
09th November, 09:45 pm
मुंबईत कर्नलच्या घरात चोरी; दागिने विकून गोव्यात केली मौजमजा

मुंबई : मालाड येथील आर्मी सेंट्रल ऑर्डनन्स डेपो परिसरातील निवासी इमारतीत घुसून बंदूक, बंदुकीच्या गोळ्या आणि दागिने चोरणाऱ्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या चोरांनी दागिने विकून मिळालेल्या पैशांतून गोव्यात पार्टी केल्याची कबुली दिली आहे. या तिघांमध्ये एक अल्पवयीन मुलगाही आहे.

गुन्हे शाखा युनिट १२ च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. तिन्ही आरोपी मालाड येथील आर्मी सेंट्रल ऑर्डनन्स डेपो परिसरातील निवासी इमारतीत दुपारी १ वाजता छोट्या गेटमधून आत शिरले. त्यांनी एक फ्लॅट रिकामा असल्याचे पाहून कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. फ्लॅटमध्ये शोध घेत असताना त्यांना एक परवाना असलेली रिव्हॉल्व्हर, नऊ गोळ्या आणि सुमारे ४८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने सापडले.

कुटुंबीय परत आल्यानंतर त्यांनी घरातील दागिने आणि बंदूक चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परवाना असलेले शस्त्र चोरीला गेल्याने मुंबई गुन्हे शाखेनेही स्वतंत्र तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले, मोबाईल लोकेशन ट्रॅक केली आणि तिघांपर्यंत पोहोचले.

शुक्रवारी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांनी मालाड खाडी परिसरात बंदूक लपविल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून बंदूक आणि नऊ गोळ्या हस्तगत केल्या.

आरोपींनी दागिने विकून मिळालेल्या पैशांतून गोव्यात जाऊन पार्टी केल्याचे उघड झाले. रविवारी गुन्हे शाखेने दीपक धनवे आणि विनायक बाविसकर यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा संशयित अल्पवयीन मुलाला बालन्याय मंडळासमोर सादर करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा