सहल बेतली जीवावर

पणजी : रविवारची सहल (picnic) दोन जीवलग मित्रांच्या जीवावर बेतली. कारमधून भटकंती करून परतताना कार (car) कालव्यात (canal) कोसळून यातील एका मित्राचा मृत्यू झाला, तर दुसरा सुदैवाने बचावला. ही हृदयद्रावक घटना (accident) कैलासनगर-अस्नोडा (Assonora-Goa) येथे घडली.
दीपेश मांद्रेकर (अस्नोडा) (Dipesh Mandrekar) असे मृताचे नाव असून शिरगाव येथील रितेश शिरगावकर (Ritesh Shirgaonkar) याचा जीव वाचला. कारमधून दोघेही आमठाणे भागातून अस्नोड्याच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. कारमधून परतत असताना कैलासनगर-अस्नोडा येथील मुख्य कालव्यानजिकच्या रस्त्यावर अंदाज चुकल्याने कार कालव्यात कोसळली. यात दीपेश मांद्रेकर याचा बुडून मृत्यू झाला, तर रितेश शिरगावकर याने कारमधून बाहेर पडून स्वत:चा जीव वाचवला.

याबाबत माहिती मिळताच डिचोली अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे कार बाहेर काढणे शक्य झाले नाही. दलाच्या जवानांनी कार बांधून ठेवली असून क्रेन बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, दीपेश मांद्रेकर याचा मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी इस्पितळात पाठवला आहे. दीपेश याचे दिवंगत वडील शिक्षक होते, तर आई शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निरीक्षकाचा तो मेहुणा होता, अशी माहितीही मिळाली आहे.