मोहम्मद सुहैल, राजकुमार मैथी, रॉयसन्स रॉड्रिग्ज, डेन्वर डिसोझा यांचा समावेश

पणजी : पर्रा येथील सर्व्हे क्रमांक ३७/३ आणि ३७/६ मधील जमीन हडप प्रकरणात गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी, राॅयसन्स राॅड्रिग्ज आणि डेन्वर डिसोझा यांच्याविरोधात म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ५६९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी न्यायालयाने दखल घेऊन पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
याप्रकरणी शेट्ये वाडा - म्हापसा येथील अांतोनियो ब्रागांझा यांनी एसआयटी तक्रार केली होती. त्यानुसार, ब्रागांझा यांच्या पर्रा - बार्देश येथे सर्व्हे क्रमांक ३७/३ मधील १,८५० चौरस मीटर आणि ३७/६ मधील ३,२५० चौरस मीटर वडिलोपार्जित जमीन आहे. ही जमीन संशयित ब्रांका दिनिज आणि राॅयसन्स रॉड्रिग्ज याच्यासह इतर संशयितांनी मागील १९९६ वर्षाचे बनावट विक्री पत्र तयार केले. त्यानंतर संशयितांनी ६ आॅगस्ट २०२१ रोजी वारसदार तयार करून २०२२ मध्ये म्हापसा येथील मामलेदार कार्यालयात वरील जमीन आपल्या नावावर करून घेतली. त्यामुळे संशयितांची फसवणूक केल्याची तक्रार एसआयटीकडे केली होती. तक्रारीची दखल घेऊन एसआयटीचे तत्कालीन प्रमुख तथा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गडकर यांनी वरील संशयितांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१,४२० आणि आरडब्ल्यू १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यासह राजकुमार मैथी राॅयसन्स राॅड्रिग्ज यांना अटक करून कारवाई केली होती. दरम्यान, या प्रकरणातील संशयित राजकुमार मैथी आणि डेन्वर डिसोझा हे दोघे फरार आहेत.
या प्रकरणी तपासपूर्ण केल्यानंतर एसआयटीने म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ५६९ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात ४० साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.