४ दिवसांची पोलीस कोठडी घेऊन पोलिसांचा तपास सुरू
वास्को : वास्कोच्या वेगवेगळ्या भागातून तीन दुचाकी चोरल्याप्रकरणी (Theft) वास्को पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली. दोघेही मूळ कर्नाटकातील तर सध्या साकवाळ येथे वास्तव्यास आहेत. वैभव रणदिवे (१९) व अझरन इक्बाल शेख (१८) अशी दोघांचीही नावे आहेत. या दोघांचा अन्य दुचाकी चोरीप्रकरणात हात आहे का, याचा तपास वास्को पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनीही टीव्हीएस एनटॉर्क (जीए-०६-वाय-७७९०), अॅक्टिव्हा स्कूटर (जीए-०८-डब्ल्यू-७७०६) आणि नोंदणी क्रमांक नसलेली अॅक्टिव्हा मिळून तीन दुचाक्या चोरल्या होत्या. या महिन्याच्या ५ ऑक्टोबरला चोरीच्या घटना घडल्या होत्या.
वास्को पोलिस ठाण्याचे हवालदार हेमंतकुमार गोसावी यांच्या तक्रारीवरून, याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली.
या दोघांना वास्को येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) यांच्यासमोर हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
वास्को पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या देखरेखीखाली हवालदार हेमंतकुमार गोसावी पुढील तपास करत आहेत. राज्यातील इतर भागात अशाच प्रकारच्या वाहन चोरीच्या प्रकरणांमध्ये आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास पोलिस करत आहेत.