पणजी : 'पाठलाग करत हल्लेखोरांकडून मारहाण'; अखेर रामाचा जबाब नोंद

मिंगेल आरावजो करत होता पाठलाग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd October, 05:20 pm
पणजी : 'पाठलाग करत हल्लेखोरांकडून मारहाण'; अखेर रामाचा जबाब नोंद

पणजी : पोलिसांनी गुरुवारी रात्री रामा काणकोणकर यांचा जबाब नोंद केला. मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत असल्याचे तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला गावडा आणि राखणदार म्हटल्याचे रामाने आपल्या जबाबात सांगितले. रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी करंझाळे येथे हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान,रामाची शुक्रवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी भेट घेतली.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर करंझाळे येथे झालेल्या हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याच्या संशयावरून कुख्यात गुन्हेगार जेनिटो कार्दोझ (वय ३६, सेंत आगुस्तिन वाडो, सांताक्रूझ) याला पणजी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत जेनिटोसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली असून, जुने गोवा आणि आगशी पोलिसांनी मिळून २३ जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी रामा काणकोणकर याने पोलिसांना जबाब दिला. पोलिसानी गुरूवारी रात्री त्याचा जबाब नोंदवून घेतला. यामुळे तपासाला आता दिशा मिळणार आहे. रामाने आपल्या जबाबात म्हटले की, मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत होता. त्यानंतर काही जणांनी आपणास मारहाण केली. मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला गावडा आणि राखणदार म्हटल्याचे रामाने आपल्या जबाबात सांगितले. रामाने दिलेल्या जबाबत काही जणांची नावे घेतली असून पोलिसांना या प्रकरणात तपास करणे सोपे जाणार आहे. दरम्यान, रामाने यापूर्वी पोलिसांना जबाब देण्यास नकार दिला. मात्र, गुरुवारी त्याने पोलिसांना जबाब दिला आहे.

उपचारासाठी डॉक्टरांची समिती स्थापन : आरोग्यमंत्री

रामाची प्रकृती गंभीर असतानाच शुक्रवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अचानक गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला भेट दिली. रामावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. डिस्चार्ज देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उपचारात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिले.

हेही वाचा