Home >> गोवा >> म्हापसा : कुचेलीत खड्डे चुकवताना स्वयंअपघात; २५ वर्षीय आर्किटेक्ट ठार

म्हापसा : कुचेलीत खड्डे चुकवताना स्वयंअपघात; २५ वर्षीय आर्किटेक्ट ठार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th September 2025, 02:46 pm
म्हापसा : कुचेलीत खड्डे चुकवताना स्वयंअपघात; २५ वर्षीय आर्किटेक्ट ठार

म्हापसा : म्हापसा येथील कुचेली-मार्ना रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून मोटारसायकल रस्त्याकडील संरक्षक भिंत व झाडाला धडकली. या भीषण स्वयंअपघातात समीर उदय नाईक (२५, रा. थिवी, मूळ गाव सांघवी-पुणे) ठार झाला.

हा अपघात शुक्रवारी (५ सप्टेंबर) पहाटे सुमारास १ वाजता घडला. समीर हा एमएच १४ एमएन ७४९२ क्रमांकाच्या हीरो एक्सप्लस मोटारसायकलवरून शिवोलीहून मार्ना मार्गे कुचेलीकडे जात होता. कुचेली पेट्रोलपंपाजवळ रस्त्यावरील खड्डे चुकविताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्याला व नंतर फणसाच्या झाडाला जोराने धडकली.

समीरने हेल्मेट घातलेले होते, मात्र अपघातात त्याचे तोंड झाडाला जोरात आपटल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. म्हापसा पोलीस उपनिरीक्षक मंगेश पाळणी व हवालदार तुषार रेडकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

समीर नाईक हा आर्किटेक्ट होता व आसगाव येथील रिओ हॉलिडे होम्स रिसॉर्टमध्ये कार्यरत होता. त्याचे वडील महाराष्ट्र पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. मूळ गाव कारवार असल्याने समीरच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था तेथे करण्यात येणार आहे.

हेही वाचा
सर्व पहा