आकाशवाणीवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची संधी मिळाली. या प्रक्रियेत आतून समृध्दी येत गेली. नागेशबाब करमली हे ज्येष्ठ कोंकणी कवी, स्वातंत्र्यसैनिक आणि आकाशवाणीचेच निवृत्त निवेदक होते. त्यांचा दरारा व आब जबरदस्त होता.
मला नागेशबाब यांची मुलाखत घ्यायला सांगितली. मी त्यांना लहानपणापासून कोंकणी चळवळीत ओळखत होतो. त्यांनी मला रवींद्र केळेकर यांच्याकडे प्रियोळला दहा वर्षांचा असताना पाहिले होते. ओळख असल्याने अवघडलेपणा तितकासा नव्हता.
मुलाखतीची सुरुवात मी गोवा मुक्ती लढ्यापासून केली. तो इतिहास फार रोचक व रंजक होता. अंगावर काटे आणणारा. त्या काळी ते केपे येथे होते. वृत्तपत्रे संध्याकाळी अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी कार्रैर (त्या काळची मिनी बस) यायची. त्यावरून बातम्या समजायच्या. नाही तर एमिसोरी (रेडिओ) केंद्राच्या बातम्या ऐकून, असे ते सांगू लागले. पोर्तुगीजांचा कब्जा किती क्रूर व भयावह होता हे त्यांनी नमूद केले. जे विरोध वा बंड करू शकतात त्यांच्यावर देखरेख होती, ठिकठिकाणी त्यांचे गुप्तहेर असत असं करमली यांनी सांगितले. पत्रकं छापणं, वाटणे ही कामे गुप्तपणे करावी लागत.
त्यांना कैद झाली तेव्हा तिथले अनुभव ऐकताना माझे डोळे अक्षरशः पाणावले. मी गहिवरलो, सावरलो. कारण भिंतीच्या गजातून त्यांनी बाहेर पाहिले तेव्हा काही स्थानिक लोक भुकेपोटी कुठं काही खायला मिळेल काय या आशेने वणवण फिरत होते हे त्यांनी पाहिलं. त्यांनी वर्णन केलं ते भयंकर होतं. असो. नागेशबाब नेहमी डायरी लिहित. त्या काळातील डायऱ्याही त्यांच्याकडे होत्या. अगदी काही पाने त्यांनी संपादित करून एका मासिकात छापली होती.
नागेशबाब यांनी आकाशवाणीवर कोंकणीला एक नवा तजेला मिळवून दिला. ते निवेदक होते. काही कार्यक्रमांची नावे, मथळे त्यांनी दिले. कांदळां वोंवळां, खळार मळार वगैरे. राजाराम राटावळी आणि पाटू पटेकार या विनोदी उपहासात्मक रेडिओ प्ले सिरीयल्स त्यांनी लिहिल्या व त्या गाजल्या. त्या सर्व संहिता व्यवस्थितपणे फायल करून ठेवल्या आहेत असे ते म्हणाले. त्यांच्या रेडिओ कारकिर्दीवर आम्ही चर्चा केली.
सांगण्यासारखी एक विशेष आठवण म्हणजे मोगुबाई कुर्डीकर यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंग. त्या सावर्डेला होत्या. त्यांना आल्तीनो पणजी रेडिओवर यायचं नव्हतं. नागेशबाब यांनी त्यांना फोन केला. त्यांनी घरी कराल तर या असं आमंत्रण दिलं. शेवटी केंद्र संचालकांनी ते मान्य केलं. सर्व मंडळीसकट जीप निघाली. तिथं पोहचल्यावर रेकॉर्डिंगच्यावेळी मोगूबाईंच्या लक्षात आलं – “आरे, हांगा रेल्वेचो आवाज घरघर येता मरे. आनीक खंयूय या.” सर्व मंडळी एका निवांत शांत घरात गेली. रेकॉर्डिंग छान झालं. रेडिओ अधिकारीही खूश झाले. मुलाखतीच्या दरम्यान नागेशबाब यांनी आपण घेतलेल्या मुलाखतींचे किस्से सांगितले. रेडिओ स्टेशनच्या स्थापनेपासून फार मोठा इतिहास त्यांनी साक्षी रूपाने अनुभवला होता. त्यातील काही स्मृतींना उजाळा दिला. ही मुलाखत नागेशबाब यांनी रंगवली.
त्यांच्या साहित्यावर चर्चा झाली. त्यांची शब्दसंपदा फार संपन्न, विपुल व अतीव शुद्ध. जोरगत आनी वंशकुळाचें देणें हे त्यांचे कोंकणी कवितासंग्रहांचे मथळे पाहा. अगदी विशुद्ध. अनुवाद करताना अनुवादकाची दमछाक होईल. दुसरी गोष्ट म्हणजे नागेशबाब यांना कविता सादरीकरण करण्याची छान दमदार शैली होती. दरम्यान त्यांनी साहित्याचे अनुवाद कोंकणीत केले आहेत, त्यावर आम्ही बोललो. खलील जिब्रान हा त्यांचा आवडता कवी. समग्र जिब्रान त्यांनी अऩेक मित्रांना भेट म्हणून दिला होता. त्यांचं साहित्य त्यांनी कोंकणीत आणलं होतं. मुलाखतीत कवितांच्या काही पंक्ती त्यांनी उद्धृत केल्या व मुलाखतीला एक साज आला.
नागेशबाब यांची ही रेडिओवरील मुलाखत विशेष आठवणीत राहिली.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)