रस मलाई

नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे. सणासुदीचा महिना म्हणजे श्रावण महिना. सण म्हटलं की गोड पदार्थ आलेच. आजची रेसिपी काहीशी अशीच आहे. चला तर मंडळी, आज आपण रस मलाईची रेसिपी पाहूया.

Story: चमचमीत रविवार |
03rd August, 12:17 am

साहित्य

१.५ लिटर दूध 

२ चमचे लिंबाचा रस

३ ते ४ केशर काड्या किंवा चिमूटभर पिवळा खाण्याचा रंग

१ बारीक वाटी पिस्त्याचे काप

चवीनुसार वेलची पूड

१ चमचा मैदा

२ मोठ्या वाट्या साखर 

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात १ लिटर दूध घ्या. शक्यतो म्हशीचं दूध घ्या. आता दुधामध्ये एक मोठा चमचा साखर घाला व छान उकळी काढून घ्या. आता यात गॅस बंद करून दोन चमचे लिंबाचा रस घाला, दूध नासण्यासाठी. पाच मिनिटांनी हे दूध नासेल. आता एका सुती कपड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढा. याने पाणी आणि नासलेलं दूध वेगळं होईल (गाळून घ्या). आता हे नासलेलं दूध स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या, म्हणजे आंबटपणा निघेल. मग हा कपडा बांधून, पूर्ण पाणी काढून घ्या. एका बाजूला ठेवा.

आता आपण रस करायला घेऊया. एका भांड्यात दीड लिटर दूध घ्या. यामध्ये ४ ते ५ केशर / खायचा पिवळा रंग, ४ ते ५ चमचे साखर आणि १ बारीक वाटी पिस्त्याचे काप घाला व हे मिश्रण दहा मिनिटे शिजवून घ्या. जास्त शिजवू नका, कारण आपल्याला घट्ट नको आहे. आता यात तुमच्या आवडीनुसार वेलची पूड घाला. तर हा रस तयार झाला. थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता मघाशी दूध बांधून आपण कपड्यामध्ये ठेवले होते ते एका भांड्यात सोडवून घ्या. आता हे नासलेल्या दुधाचा थोडा थोडा भाग घ्या व हाताने छान तेल सुटेपर्यंत मळून घ्या. तेल सुटलं की यात १ चमचा मैदा घाला. छान एकत्र करा व त्याला मलाईसारखा आकार द्या. एका पसरट भांड्यात पाणी घ्या व त्यात एक कप साखर घाला. साखर सगळी विरघळली की त्यात केलेली मलाई घाला व दहा मिनिटे बारीक गॅसवर शिजत ठेवा. या मलाईचा आकार आता मोठा झाला की पाण्यातून काढा. मग ही मलाई मगाशी आपण रस केला होता त्यात घाला. ही मलाई तीन ते चार तास भिजत ठेवा.

टीप: आता रक्षाबंधन जवळ येत आहे आणि काहीतरी गोड आपल्या भावाला करावं असं प्रत्येक बहिणीच्या मनात असतं. या वर्षीच्या रक्षाबंधनला ही रस मलाई नक्की करून पहा आणि आपल्या प्रिय भावाला आनंदित करा.


शिल्पा रामचंद्र, 
मांद्रे