काळाबरोबर नाटकाचे स्वरूप बदलले

उत्सवानिमित्त देवस्थानाच्या प्रांगणात होणाऱ्या नाटकाबरोबरच गावागावातही नाटके होऊ लागली. यामुळे हौशी रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांची संख्याही वाढली. त्याचबरोबर नाटक सादरीकरणामध्ये मोठे बदल झाले. अत्याधुनिक पद्धतीने हौशी रंगभूमीवर नाटके आता सादर केली जात आहेत.

Story: रंगमंच |
03rd August, 12:13 am
काळाबरोबर नाटकाचे स्वरूप बदलले

सुरुवातीला चार-पाच अंकी असलेल्या नाटकाचे स्वरूप तीन अंकांपर्यंत येऊन आता हळूहळू दोन अंकांवर येऊन थांबले. त्याचप्रमाणे दोन-तीन स्त्री कलाकार असलेले नाटक आता एक स्त्री पात्रावर घेऊन थांबले आहे. नाही म्हणजे, शहरी भागात व काही ठिकाणी ग्रामीण भागातही दोन-तीन स्त्री पात्रं असलेले दर्जेदार सामाजिक व ऐतिहासिक नाटके होत होती व अजूनही होत आहेत. मात्र, सर्वसाधारण नाट्यसंस्थेच्या मनात असूनही ते असे दोन-तीन स्त्री पात्र असलेली दर्जेदार नाटके पैशांच्या अभावामुळे सादर करू शकले नाहीत. साधारण १९७० नंतर एक स्त्री पात्र असलेल्या नाटकांनी हौशी रंगभूमीवर धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्रातील अनेक नाट्य लेखकांनी एकपात्री स्त्री असलेली सामाजिक नाटके लिहिली, जी गोव्याच्या हौशी रंगभूमीवर मोठ्या उत्साहाने सादर होऊ लागली. गोव्यातील रमाकांत पायाजी यांनीही अनेक नाटके लिहिली. गोकुळदास मुळवी यांनी सत्य घटनेवर आधारित "तू आई आहेस का?" हे नाटक लिहिले, ते गोव्यात प्रचंड प्रमाणात गाजले. उत्सवानिमित्त देवस्थानाच्या प्रांगणात होणाऱ्या नाटकाबरोबरच गावागावातही ही नाटके होऊ लागली. यामुळे हौशी रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकांची संख्याही वाढली. त्याचबरोबर नाटक सादरीकरणामध्ये मोठे बदल झाले. अत्याधुनिक पद्धतीने हौशी रंगभूमीवर नाटके आता सादर केली जात आहेत.

हौशी रंगभूमीवर कोंकणी नाटकाचे पदार्पण

१९५५ ते ६० या दरम्यान कोंकणी नाटकाने हौशी रंगभूमीवर पदार्पण केले. पुंडलिक नारायण दांडे यांनी लिहिलेल्या "ताची करामत" या नाटकाचे प्रयोग हौशी रंगभूमीवर सादर झाले. हे कोंकणी भाषेतले पहिले विनोदी नाटक होते. हे नाटक बऱ्याच प्रमाणात गाजलेही. त्यानंतर दांडे यांनी "निमित्याक कारण" हे खंबीर स्वरूपाचे दुसरे नाटक लिहिले. मात्र, हौशी रंगभूमीवर कोंकणी नाटकांची चळवळ खऱ्या अर्थाने १९९० सालानंतर सुरू झाली.

हार्मोनियम (पेटी) आणि पार्श्वसंगीत

संगीताशिवाय नाटक नाही असा प्रघात होता. नाटकाची सुरुवात ही नांदीपासूनच व्हायची. त्यामुळे नाटकात हार्मोनियम (पेटी) आणि तबला असणे ही प्रथाच होती. नाटकांच्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी पेटी मास्तर नाटकांची पदे बसवून जायचे, ज्यामुळे गायक कलाकारांना पदे पाठ करण्याची संधी मिळत होती. त्या काळात दिग्गज असे पेटी मास्तर गोव्यात होते. उदाहरणार्थ: तुकाराम फोंडेकर, सखाराम बापू बर्वे, कमलाकांत बर्वे, सुरेश बाबू बांदोडकर, मनोहर बुवा शिरगावकर, नाना शिरगावकर, बाबल रेडकर, बाबय हडफडकर आदी.

पूर्वी नाटकात पार्श्वसंगीत हे हार्मोनियम व तबल्यापासूनच दिले जात होते. नाटकात लढाईचा प्रसंग असला म्हणजे पेटीने व तबल्याने साथ द्यायची हे ठरलेले असायचे. भावनिक प्रसंगाला पेटीचे सूर असायचे आणि एखाद्यावर बंदूक चालवायची असेल तर आतून फुगा फोडला जात होता. मात्र, बंदुकीचा आवाज व फुग्याचा आवाज एकत्र झाला नाही तर मोठी फजिती व्हायची. असे प्रसंग अनेक नाटकात घडलेले आहेत.

टेप रेकॉर्डर आल्यानंतर त्यावर नाटकाच्या आवश्यकतेनुसार पार्श्वसंगीत रेकॉर्ड करून नाटकात वापरले जात होते. हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केल्याने नाटकाची नांदी व पार्श्वसंगीत लॅपटॉप किंवा इतर सुविधांतून दिले जात आहे. त्यामुळे नाटकांच्या सादरीकरणाचा दर्जाही वाढलेला आहे. मात्र, त्याचा परिणाम असा झाला की, हौशी रंगभूमीवरील पेटी व तबला गायब झाले.

प्रॉम्प्टर

हा नाटकातला महत्त्वाचा घटक. नाटक पाठांतर असो अथवा नसो, पण नाटकाच्या पडद्यामागे प्रॉम्प्टरची भूमिका महत्त्वाची. नाटक हे रंगमंचावर प्रत्यक्षपणे सादर होत असते. नाटकात झालेली चूक दुरुस्त करता येत नाही, त्यासाठी संवाद फेक करताना चुका होऊ नये यासाठी नाटकात प्रॉम्प्टरची भूमिका महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी नाटक कलाकारांना तोंडपाठ असायचे, त्यामुळे प्रॉम्प्टर हा नावापुरता असायचा. मात्र आता त्याची जबाबदारी वाढलेली आहे.

आताच्या काळात नाटकात एक-दोन भूमिका केल्यामुळे कलाकाराला आपण मोठा कलाकार असल्याचा मोठेपणा येतो. त्याचबरोबर अति आत्मविश्वासही वाढतो. यामुळे तो भाषण पाठ करत नाही. किंबहुना, हल्लीच्या कलाकारांना नाटक पाठांतर करण्यास वेळही नसतो, त्यामुळे प्रॉम्प्टरचेही आयतेच फावले आहे. आजकाल हौशी रंगभूमीवर कलाकारांपेक्षा प्रॉम्प्टरचाच आवाज प्रेक्षकांना जास्त ऐकू येत आहे. शिवाय, नाटक सुरू असताना विंगेच्या आतून हळूच डोके बाहेर काढून प्रेक्षकांना पाहण्याची सवय जडलेली आहे. आपण कलाकारांपेक्षा चांगला सूत्रधार आहे हे दाखवण्याची सवय त्याला जडलेली आहे.

हौशी रंगभूमी टिकेल का?

सध्या हौशी रंगभूमीची जागा व्यावसायिक रंगभूमीने घेतली आहे. भविष्यात हौशी रंगभूमी टिकेल का हा मोठा प्रश्न आहे. याला अनेक कारणेही जबाबदार आहेत:

हौशी नाटकांचा खर्च वाढलेला आहे. दिग्दर्शक, स्त्रीपात्र, पार्श्वसंगीत, रंगमंच मिळून पंचवीस-तीस हजार खर्च अपेक्षित आहे. मात्र व्यावसायिक नाटक १८-२० हजारात आणणे शक्य आहे.

स्त्री पात्रांचे मानधन प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. मात्र त्यांना महिनाभर नाटके मिळत नसल्याने, त्या नाटकाच्या दिवशी येऊन भूमिका करत असल्याने नाटकाचा दर्जा खालावतो. पूर्वीप्रमाणे पाच-सहा दिवसांपूर्वी येऊन रंगीत तालीम द्यायला त्यांना सवड मिळत नाही.

कलाकारांनाही आता तालीम घ्यायला वेळ मिळत नाही. त्यातच भाषणही पाठांतर नसते.

व्यावसायिक नाटके दर्जेदार होतात. त्यामानाने काही अपवाद वगळता हौशी नाटके दर्जेदार होत नाहीत. केवळ रात्र जागवायची या उद्देशानेच नाटक केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आशेचा एकच किरण म्हणजे, सध्या काही कोंकणी लेखकांनी खास महिलांसाठी नाटके लिहिली आहेत, त्यामुळे गावागावात सध्या हौशी रंगभूमीवर त्यांची नाटके होत आहेत. वास्तविक, व्यावसायिक नाटकांपेक्षा स्थानिक कलाकाराने केलेल्या नाटकाला प्रेक्षकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीनुसार नाटक झाले तर भविष्यात हौशी रंगभूमी उजळून निघू शकते. सध्या हौशी रंगभूमीवर स्थानिक कलाकारांनी नाटके करावीत व हौशी रंगभूमीला प्रोत्साहन मिळावे यासाठी कला व सांस्कृतिक खात्यातर्फे मानधन दिले जात आहे. गोवा सरकारने या मानधनात वाढ करून दिल्यास, निदान महिला वर्गाकडून हौशी रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस येण्यास अशक्य नाही असे दिसून येत आहे. शिवाय, हौशी रंगभूमीवरील कोंकणी नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून मडगाव येथील भांगराळें गोंय ही संस्था स्पर्धेचे आयोजन करत आहे. हौशी रंगभूमीवर होणाऱ्या कोंकणी नाटकांचे परीक्षण थेट नाटक सादर होणाऱ्या ठिकाणी जाऊन करतात. हौशी रंगभूमी टिकवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


उमेश नाईक, कुळे
(लेखक ‘गोवन वार्ता’चे धारबांदोडा प्रतिनिधी आहेत.)