नवल म्हणजे जंगलातील या नेटवर्किंगला www पण ''वुड वाईड वेब'' असे म्हणतात. या नेटवर्किंगद्वारे वृक्ष एकमेकांशी संवाद साधतात. वनस्पती एकमेकांशी संवाद कसा साधतात, एकमेकांची काळजी कशी घेतात, वृक्षांमधील नेटवर्किंग नक्की का महत्त्वाचं असतं याबाबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
इंटरनेट हा लहान-थोरांना परिचित असलेला शब्द. जगातील बहुतांश लोकांचा इंटरनेटशी सर्रास संबंध येतो. लहान-सहान गोष्टींसाठी आपण इंटरनेटवर अवलंबून असतो. इंटरनेटमुळे आपण घरबसल्या संपूर्ण जगाची वारी करु शकतो. या माध्यमातून आपण सातासमुद्रापलीकडे असलेल्या नातेवाईकांशी, हितचिंतकांशी संवाद साधू शकतो. इतकेच नव्हे तर इंटरनेटच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू जसे किराणा, आरोग्याशी निगडित औषधे व इतर गरजेचे साहित्य आपल्याला घरपोच मिळणे शक्य होते. संशोधन, आर्थिक व्यवहार, भाषांतर, पत्ता शोधणे, भूखंड मापन यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी सुद्धा आपण इंटरनेटवर अवलंबून असतो. पण इंटरनेट म्हणजे नक्की काय? जगभरातील संगणक नेटवर्कचे एक विशाल जाळे (नेटवर्क ऑफ नेटवर्क्स) म्हणजे इंटरनेट. हे जाळे विविध प्रकारच्या संगणक, सर्व्हर्स व उपकरणांना एकमेकांशी जोडून माहितीची देवाणघेवाण करण्याचे कम करते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इंटरनेट म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रदान करण्याचे एक साधन; आणि हे सगळे शक्य होते वर्ल्ड वाईड वेबमुळे. वर्ल्ड वाईड वेब ही इंटरनेट संदेशवहन कार्यप्रणाली संपूर्ण जगाला तंत्रज्ञानाच्या जोरावर बांधून ठेवते.
तुम्ही म्हणाल की पर्यावरणीय सत्रात तंत्रज्ञान विषयक लिखाण कुठून आलं? वाचून आश्चर्यचकित व्हाल पण काॅक्रिटच्या जंगलाप्रमाणे हिरव्यागार जंगलातही नेटवर्कचे एक विशाल जाळं असतं ज्याच्या माध्यमातून वनातील वृक्ष, वनस्पती, झाडे-झुडपे आपापसात संदेशवहन करतात. झाडांच्या या विस्तीर्ण अशा www सारख्या जाळ्यात अमर्याद अशी माहिती साठवलेली असते. नवल म्हणजे जंगलातील या नेटवर्किंगला www पण ''वुड वाईड वेब'' असे म्हणतात. या नेटवर्किंगद्वारे वृक्ष एकमेकांशी संवाद साधतात. वनस्पती एकमेकांशी संवाद कसा साधतात, एकमेकांची काळजी कशी घेतात, वृक्षांमधील नेटवर्किंग नक्की का महत्त्वाचं असतं याबाबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
"वुड वाइड वेब" हे बुरशीजन्य तंतूंच्या जटिल नेटवर्कचे रूपक आहे, ज्याला "मायसेलिया" असे म्हणतात. मायसेलिया झाडे व इतर वनस्पतींच्या मुळांना जमिनीखालून जोडून त्यांचं एक जाळं विणते. हे जाळं नेटवर्कमधील सगळ्या झाडांना पाणी व अत्यावश्यक पोषक तत्त्वांना पुरवण्यासाठी वाहिनी म्हणून काम करते. नॅशनल फॉरेस्ट फाउंडेशनच्या मते, वुड वाइड वेब इंटरनेट सेवे बुरशी 'केबल्सच' तर वृक्ष कनेक्टेड संगणकाप्रमाणे काम करतात. हे नेटवर्क झाडांना पाणी, नायट्रोजन आणि कार्बन यासारखे पोषक घटक पुरवतात. वेळ पडल्यास हे नेटवर्क झाडांना संभाव्यतः धोक्याची चेतावणीही (सिग्नल) देते.
जंगलातील मोठे वृक्ष लहान झाडांचा सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात. हे वृक्ष लेकरांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्यं पुरवितात. जंगलातील वृक्ष सतत एकमेकांशी संवाद साधत असतात. एखादे झाड आजारी असल्यास हे नेटवर्क त्याची सुश्रुषाही करते. वाचून नवल वाटतं आहे? हे आणि काय विचित्र? असं असतं का कधी? असे प्रश्न पडत असतील. मग पुढची गंमतही वाचा.
रस्त्याच्या बाजूला एकटे वाढत असलेले झाड आणि जंगलात इतर झाडांच्या सानिध्यात वाढत असलेले झाड, यापैकी कोणतं झाड अधिक काळ जगण्याची शक्यता असते? स्वाभाविकच जंगलातील झाड. पण का? याचे उत्तरही जंगल नेटवर्किंग! रस्त्याच्या बाजूला वाढणाऱ्या झाडाचे आयुष्य हे जंगलात वाढणाऱ्या झाडापेक्षा कमी असते. याचे मुख्य कारण म्हणजे नेटवर्किंगचा अभाव. संशोधनाप्रमाणे, एकटं वाढणाऱ्या झाडाच्या तुलनेत इतर वृक्षांच्या समूहात वाढणारे झाड दीर्घायुषी होते. एकही पान मागे न ठेवता जरी एखादे झाड तोडले तरीही त्या झाडाच्या बुंध्याला नवीन पालवी फुटताना आपण बरेचदा पाहिले आहे. पानांविरहीत झाडाला प्रकाशसंश्लेषणाशिवाय पोषक तत्त्वं कोण बरं पुरवतं? नेटवर्किंग! झाडं ही सदैव सामाजिक जीवन जगत असतात. तोडलेल्या झाडाला इतर झाडं मुळांच्या माध्यमातून अन्न पुरवठा करतात ज्यामुळे या झाडाला नवीन पालवी फुटते. हा पुरवठा एक-दोन दिवसांसाठी मर्यादित नसून वर्षानुवर्षे चालू राहू शकतो.
नेटवर्किंगद्वारे झाडे एकमेकांना धोक्याची पूर्व सूचना देत परस्परांना माहिती पुरवत असल्याचेही संशोधन सांगते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९८० च्या दशकात दक्षिण आफ्रिकेत दुष्काळाच्या काळात अचानक मरण पावणारे कुडू प्राणी. कुडू हा दक्षिण आफ्रिकेत आढळणारा एक हरणासारखा प्राणी. हा प्राणी जगण्यासाठी बाभूळ या टॅनिनयुक्त वनस्पतीवर अवलंबून असतो. आफ्रिकेच्या जंगलात ही वनस्पती असंख्य प्रमाणात आढळते. १९८० मध्ये दक्षिण आफ्रिकेत भयानक दुष्काळ पडला होता. कुडू प्राणी अचानक मरण पावू लागले. आफ्रिकेत पुष्कळ प्रमाणात बाभूळ उपलब्ध असल्याने कुडू दुष्काळामुळे मरण पावणे शक्य नव्हते. पोस्टमॉर्टेम अहवाल चकीत करणारा होता. टॅनिनचं जास्त प्रमाणात सेवन कुडूच्या मरण पावण्यामागचे कारण होते. जास्त प्रमाणात टॅनिन कुठून आले याचा शोध घेतला असता अवाक् करणारी गोष्ट पुढे आली. दुष्काळामुळे कुडू पूर्णपणे बाभळीवर अवलंबून होते. यामुळे टॅनिनयुक्त बाभळीने नेटवर्किंगद्वारे आपल्या संरक्षणार्थ जास्त टॅनिन तयार करण्यास सुरवात केली, ज्यामुळे ही वनस्पती विष बनली. कुडूंनी चरलेल्या झाडांनी सोडलेले संरक्षण सिग्नल वाऱ्याने इतर झाडांकडे वाहून नेले जात होते, त्यामुळे कुडूने न चरलेली बाभूळीची वनस्पती देखील जास्त टॅनिन तयार करत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. यावरुन वनस्पतीचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा वेगळे नसल्याचे सिद्ध झाले.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)