स्पर्धा परीक्षा - दिवसाचे नियोजन

एक लक्षात ठेवा की या विषयावरील प्रश्न कसा सोडवायचा हे लक्षात येत नसेल, तर उगाच वेळ घालवू नका. लवकरात लवकर कोणाकडून तरी ‘टेक्निक’ समजून घ्या.

Story: यशस्वी भव: |
03rd August, 12:09 am
स्पर्धा परीक्षा -  दिवसाचे नियोजन

अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा हे कळत नसते. कधी काय करू? काय वाचू? कधी उठू? आणि कधी झोपायला जाऊ? हेच कळत नसते. जवळपास सर्व कठीण व सर्व स्पर्धा परीक्षांसाठीचा हा गोंधळ सर्वत्रच आहे. विशेषतः पदवी मिळाल्यानंतर व पुढील शिक्षण घेत नसेल, तर एक वेगळेच रिकामेपण अनुभवास यायला लागते. या रिकामेपणामध्ये कोणीतरी सुचवतं की, "अरे, स्पर्धा परीक्षांना का नाही बसत?" मग महाशय गंमतीने फॉर्म भरतात. तिथून गोंधळ उडायला सुरुवात होते.

दिवसाचे नियोजन करायच्या आधी त्यांनी मनाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिलं म्हणजे आपण ज्या पदाच्या परीक्षेला बसत आहोत त्या पदाचे नेमके काय काम असते? ते आपल्याला जमणार, आवडणार, झेपणार आहे का याचा विचार व अभ्यास आवश्यक आहे. ते आधी तपासून घ्यावे.

 समजा CBI ची परीक्षा देणार असाल, तर CBI च्या संकेतस्थळावर जाऊन इत्यंभूत माहिती घेणे अत्यंत गरजेचे असते. त्याची कामं, कामाच्या ठिकाणाची पोस्टिंग, आवश्यक कौशल्यं काय काय लागणार आहे, याची माहिती आधीच मिळवावी.

ज्या स्पर्धा परीक्षेला बसत आहात, त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम तोंडपाठ असला पाहिजे. जेणेकरून अनाकलनीय अभ्यासक्रमाची भीती निघून गेली की मन हलकं होतं व अभ्यासाची सुरुवात करायला उत्साह येतो. जे जे विषय अभ्यासाला आहेत त्याची सर्व पुस्तके दुकानातून विकत आणावीत. जमल्यास व शक्य असल्यास दोन वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तके आणावीत. थोडा खर्च होईल, पण आजकालच्या फालतू, महागड्या मोबाईलसाठी एवढा खर्च मुले करतात, तर अभ्यासासाठी खर्च केलेला कधीही वाया जात नाही. याचा पुढे भविष्यात खूप फायदा होतो.

प्रत्येक पुस्तक दिवसभर चाळून घ्यावे. म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत चाळत जावे. एकूण आवाका लक्षात येतो. म्हणजे समजा रिझनिंगचं पुस्तक चाळायचं झालं, तर एक तासात चाळून होतं. यामध्ये कोणकोणते चॅप्टर आणि सबचॅप्टर आहेत हे लक्षात यायला लागतं. यावेळेस पुस्तक वाचायचं नसतं. येथून आता अभ्यासाची सुरुवात होते.

प्रत्येक विषयाला एक स्वतंत्र फुलस्केप नोटबुक करावी व टाइमटेबल बनवावं. आपल्या अभ्यास करण्याच्या दिवसापासून परीक्षेच्या तारखेपर्यंत किती दिवस उपलब्ध आहेत याचा आढावा घ्यावा. साधारणपणे दिवसातून तुकड्यांत, २-२ तासांच्या प्रमाणे ८ तास अभ्यास करणं आवश्यक आहे. सकाळी सात ते आठ, मग दहा ते बारा, तीन ते पाच व सहा ते आठ या प्रकारे विभागणी करावी. यात जेवण, झोप, विश्रांती आणि मनन सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे.

स्टडी कॅलेंडर बनवताना कोणता विषय कोणत्या दिवशी करायचा आहे हे बनवावं. याने उपलब्ध दिवसांमध्ये सर्व पोर्शन व्यवस्थित पूर्ण होतो. आपल्याला मध्ये मध्ये त्याच विषयावरील यूट्यूब वरील व्याख्याने ऐकायची आहेत, हे लक्षात ठेवा. सकाळच्या सत्रात चालू घडामोडी व इंग्रजी विषय केल्यास ते लक्षात राहतात. सकाळचा प्रहर हा मेमरी सब्जेक्ट्ससाठी ठेवावा. यात जनरल स्टडीज, इतिहास, भूगोल हे विषय वाचावेत आणि याचे नोट्स काढावेत. नोट्स स्वहस्ते काढावेत. विषय हाताखालून लिहून गेल्यास तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. अभ्यासापेक्षा त्याचे रूपांतर ज्ञानामध्ये होते.

दुपारच्या सत्रात मेंटल अबिलिटीस चे प्रश्न सोडवावेत. तिथे मेंदूला ताण देऊन विचारपूर्वक उत्तरे द्यायची असतात. पुढील विषय घ्यावेत; न्युमरिकल अबिलिटी, अप्टिट्यूड, रिझनिंग. समजा कुठे क्लास अथवा ट्युशन लावले असेल तर अतिउत्तम! कारण या विषयाचे प्रश्न सोडवण्याचे जर टेक्निक कोणाकडून शिकता आलं, तर त्याचा फार फायदा होतो.

एक लक्षात ठेवा की या विषयावरील प्रश्न कसा सोडवायचा हे लक्षात येत नसेल, तर उगाच वेळ घालवू नका. लवकरात लवकर कोणाकडून तरी ‘टेक्निक’ समजून घ्या.

दिवसभरात मनन करायला विसरू नका.

 आठवड्याच्या रविवारी अर्धा दिवस तयार केलेले नोट्स वाचन करावेत व झालेला अभ्यास सतत कोणाबरोबर तरी डिस्कस करावा. जरा फिरून यावं. रोज थोडं म्युझिक ऐकणं, सफरचंद व केळी खाणं हे सगळं मनाला उभारी देतं. जेव्हा अभ्यासात मन लागत नसेल, तर करू नका.चित्रपट पाहावा किंवा सरळ एक मस्त झोप काढावी. दर रविवारी एक मॉक टेस्ट द्यावी.

बघा, नीट नियोजन केलं तर यश नक्की मिळतं...


अॅड. शैलेश कुलकर्णी,
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)