गोव्यात मानसिक आरोग्याच्या रुग्णांत ३ वर्षांत ४ टक्के वाढ

उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात अधिक रुग्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st July, 11:48 pm
गोव्यात मानसिक आरोग्याच्या रुग्णांत ३ वर्षांत ४ टक्के वाढ

पणजी : राज्यात विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या रुग्णांत ३ वर्षांत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात २०२२-२३ मध्ये मानसिक आजारांबाबत एकूण १८ हजार ६८७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून १९ हजार ४२४ झाली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार आलेक्स रेजीनाल्ड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२२-२३ मध्ये उत्तर गोवा जिल्हा इस्पितळातील ८,२७४ रुग्णांत विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आढळून आल्या होत्या. यातील बहुतेक रुग्ण हे १९ ते ५९ वर्षे वयोगटातील होते. पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांचे प्रमाण कमी होते. उत्तरेत २०२३-२४ मध्ये ८,८५४ तर २०२४-२५ मध्ये ९,१८२ रुग्णांत अशा समस्या आढळून आल्या. तर एप्रिल ते जून २०२५ दरम्यान २,४१० रुग्णांत या समस्या आढळून आल्या होत्या. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण गोव्यात अशा समस्या असणारे रुग्ण अधिक होते.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात २०२२-२३ मध्ये १०,४१३, २०२३-२४ मध्ये ९,०११ तर २०२४-२५ मध्ये १०,२४२ रुग्णांत मानसिक आरोग्याच्या समस्या आढळून आल्या होत्या. दक्षिण गोव्यात पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांचे प्रमाण अधिक होते. याशिवाय २०२२ ते २०२४ दरम्यान विविध प्रकारच्या मानसिक आरोग्य समस्यांसाठी मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेमध्ये (आयपीएचबी) २८२२ रुग्ण भरती झाले होते. याशिवाय मागील तीन वर्षांत आयपीएचबीच्या बाह्य रुग्ण विभाग सेवेचा (ओपीडी) १.२० लाख रुग्णांनी लाभ घेतल्याचे उत्तरात म्हटले आहे.
‘टेले मानस’ला १८ हजार कॉल
राज्य सरकारने मानसिक आरोग्यासाठी टेले मानस ही टेलीफोनिक हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. या सेवेला विविध प्रकारच्या २२ जुलै अखेरीस १८ हजार ४५ कॉल आले आहेत. यातील सर्वाधिक कॉल हे १८ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींचे होते.