पत्रकारांच्या वर्तनाबाबत ‘गुज’ बनवणार मार्गदर्शक तत्त्वे

राजतिलक नाईक : मडगाव येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय


29th June, 12:33 am
पत्रकारांच्या वर्तनाबाबत ‘गुज’ बनवणार मार्गदर्शक तत्त्वे

कार्यक्रमात बोलताना गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक. सोबत वासुदेव पागी व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : काही स्वयंघोषित पत्रकारांमुळे पत्रकार समुदायाची प्रतिमा मलीन होत आहे. पत्रकार लोकांच्या समस्या मांडण्यासाठी पत्रकारिता करत असतो. याची जाणीव पुन्हा करून देण्यासाठी गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टकडून (गुज) संस्था सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (अ‍ॅडव्हायझरी) काढण्यात येतील. यातून पत्रकारिता करताना समाजात वावरतानाची व्यावसायिक व नैतिक वागणूक यावर भर देण्यात येईल, असे गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी सांगितले.
गुजची वार्षिक सर्वसाधारण सभा मडगाव येथील पालिका इमारतीच्या पत्रकार कक्षात शनिवारी झाली. यावेळी गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक, सचिव वासुदेव पागी, अमरेश परब यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. गुजचे पणजी, म्हापसासह दक्षिण सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या जमा-खर्चाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय स्वयंघोषित पत्रकारांवर निर्बंध आणण्यासाठी गोवा राज्य अधिस्वीकृती पत्राबाबतच्या (पीएसी) नियमांत बदल केल्यानंतर मुख्य प्रवाहाबाहेरील डिजिटल चॅनल व पोर्टलवर निर्बंध येतील, असे सांगण्यात आले. गुज जर्नालिस्ट क्लबची निर्मिती करणे, नोंदणीकृत मीडिया हाऊसमध्ये शिकाऊ उमेदवारांना संधी देणे, पत्रकारांसाठीच्या योजनांसह पेन्शन योजनेवर चर्चा करण्यात आली व काही बदल सुचवण्यात आले.
गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक म्हणाले...
गुजचे सदस्य राज्यात सर्वत्र आहेत. म्हणून यावेळी प्रथमच पणजीच्या बाहेर सभा घेतली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
सभेत पत्रकारांना भेडसावणार्‍या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
पत्रकारांच्या हक्कांवर गदा येणार नाही यासाठी संस्था कार्यरत आहे.
लोकांत पत्रकारांविषयी विविध भावना आहेत.
गुजकडून पत्रकारांनी समाजात कसे वागावे व कसे वागू नये, याबाबत सल्ला देणारे पत्रक काढले जाईल.
स्वयंघोषित पत्रकार, डिजिटल चॅनल, पोर्टलची मनमानी कमी होण्यासाठी पीएसी नियमावली केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांवेळी येणार्‍या अडचणींवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल.      

हेही वाचा