राज्यात जूनच्या २८ दिवसांत ३० इंच पावसाची नोंद

२९ जून ते ४ जुलै दरम्यान मध्यम पावसाची शक्यता


29th June, 12:28 am
राज्यात जूनच्या २८ दिवसांत ३० इंच पावसाची नोंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ ते २८ जून दरम्यान सरासरी ३० इंच पावसाची नोंद झाली. मागील वर्षी पावसाने २७ जून रोजी ३० इंचाची सरासरी पूर्ण केली होती. शनिवारी राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. राज्यात २९ जून ते ४ जुलै दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे. यानुसार या सहा दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यात २४ तासांत सरासरी १.०७ इंच पाऊस पडला. यादरम्यान केपेमध्ये १.७७ इंच, सांगेमध्ये १.६६ इंच, पेडण्यात १.६० इंच, काणकोणमध्ये १.५४ इंच, धारबांदोडात १.४२ इंच, फोंडामध्ये १.२२ इंच, साखळीत १.११ इंच, तर जुने गोवेमध्ये ०.९१ इंच पावसाची नोंद झाली. रविवारी रात्री ११.३० पर्यंत शापोरा किल्ला ते मालीम आणि वास्को ते कोळंब येथील समुद्रात ३.४ ते ३.६ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या दरम्यान या भागात सतर्क राहण्याचा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.
शनिवारी पणजीत कमाल २९.६ अंश तर किमान २५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील पाच दिवस राज्यातील कमाल तापमान ३० ते ३१ अंश, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
          

हेही वाचा