राेजगाराच्या गॅरंटीमुळे गुणवंतांचा आयटीआयकडे ओढा

एकूण १,४६० विद्यार्थ्यांचे अर्ज : ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले २५ जण इच्छुक


23rd June, 12:10 am
राेजगाराच्या गॅरंटीमुळे गुणवंतांचा आयटीआयकडे ओढा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दहावी किंवा बारावी परीक्षेत कमी गुण मिळालेलेच विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश घेतात, ही मानसिकता आता बदलली आहे. गेल्या काही वर्षांत आयटीआयमध्ये रोजगार देणारे कोर्स सुरू केले आहेत. आयटीआय करूनही चांगली नोकरी अथवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायची संधी मिळत आहे. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथमच ९४.१७ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थिनीने प्रवेशासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती कौशल्य विकास खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनी दिली.
गावकर यांनी पुढे सांगितले की, यंदाच्या आयटीआय अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या १,४६० विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमांसाठी अर्ज केले आहेत. यातील ११ विद्यार्थ्यांना दहावीत ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. २५ विद्यार्थ्यांना ८० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. एकूण उमेदवारांपैकी १२ टक्के विद्यार्थी दहावीत ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेले ३९ टक्के, म्हणजेच ५७६ विद्यार्थी आहेत.
काळाची गरज ओळखून खात्याने आयटीआयसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आता पारंपरिक आणि नवीन अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जात आहे. उद्योग क्षेत्रातही अशा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांची मागणी वाढत आहे. यामुळे आयटीआय केलेल्या उमेदवारांना रोजगार संधी मिळत आहेत. अशा विविध कारणांमुळे दहावीत चांगले गुण मिळालेले विद्यार्थी आयटीआयकडे वळत आहेत. सध्या इलेक्ट्रिशियन, हॉस्पिटॅलिटी, थ्रीडी प्रिंटिंग अशा अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खात्याने ताज ग्रूपसोबत केलेल्या करारामुळे विद्यार्थ्यांना सहा महिने प्रशिक्षण, तसेच सहा महिने हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. आयटीआयमध्ये सध्या ४२ विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, प्लंबर, टर्नर, अशा पारंपरिक अभ्यासक्रमांसह ड्रोन टेक्निशियन, मल्टीमीडिया अॅनिमेशन स्पेशल इफेक्ट, फूड अँड ब्रेव्हरेज सर्व्हिस असिस्टंट, स्मार्टफोन टेक्निशियन आणि अॅप टेस्टर अग्नी सुरक्षा व्यवस्थापन, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गावकर यांनी दिली.
बारावी उत्तीर्ण ४७ विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी अर्ज
यंदाच्या शैक्षणिक वर्षात आयटीआय प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या ४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यातील १९ जणांना बारावीत ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, तर ८ जणांना ७० टक्के किंवा अधिक गुण मिळाले आहेत.