मुळगाव वारीतील शंकर गाड यांचे आंबेली येथे हृदयविकाराने निधन

वारकरी, डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी : दोडामार्ग पोलिसांत नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd June, 12:38 am
मुळगाव वारीतील शंकर गाड यांचे आंबेली येथे हृदयविकाराने निधन

दोडामार्ग : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जात असलेले मुळगाव वारीतील शंकर गाड यांचे आंबेली येथे हृदयविकाराने निधन झाले. 

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करत असलेल्या मुळगाव (गोवा) येथील वारकऱ्यांची दिंडी दोडामार्गपासून चार किलोमीटर अंतरावर आंबेली कोनाळकरवाडी येथे चढावावर आली. त्यावेळी वारकरी शंकर काळू गाड (७४, शिरोडकरवाडा, मुळगाव) यांना हदयविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. सोबत असलेले डॉक्टर, वारकरी यांनी छातीवर दाब देऊन, तसेच सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. काही प्रतिसाद न मिळाल्याने तातडीने दोडामार्ग रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचारासाठी प्रयत्न केले; पण यश आले नाही. शंकर गाड यांचे निधन झाले. विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी दोडामार्गपर्यंत पतीला साथ देत वारीत सहभागी झाल्या होत्या.

सातेरी केळबाय वारकरी मंडळ, मुळगाव ही वारी शनिवारी मुळगाव येथून निघाली. सायं. ५.३० वा. दोडामार्ग येथून दिंडीने प्रस्थान केले. साटेली भेडशी येथे मुक्काम होता. हे वारकरी पुढे प्रस्थान करत असताना आंबेली कोनाळकरवाडी येथे शंकर गाड यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले. त्यांना इतर वारकरी, डॉक्टर यांनी सीपीआर देऊन वाचवण्यासाठी प्रयत्न केले. हालचाल होत नसल्याने तातडीने त्यांना दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. तेथील तीन डॉक्टरांनी सर्वताेपरी प्रयत्न केले; पण शंकर गाड यांना वाचवण्यात अपयश आले.

शंकर गाड यांच्या निधनाचे वृत्त कळताच वारकरी, त्यांचे पुत्र, नातेवाईक, मुळगाव ग्रामस्थ दोडामार्ग रुग्णालयात दाखल झाले. दोडामार्ग पोलीस रुग्णालयात दाखल झाले. दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस, पराशर सावंत रुग्णालयात आले. शंकर गाड हे निवृत्त पोलीस होते. यापूर्वी त्यांनी अनेक वेळा पंढरपूर वारी पायी चालत केली आहे. शंकर गाड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सून, असा परिवार आहे. दोडामार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा