सिंधुदुर्ग हादरला! देवगडमध्ये भीषण अपघात, रिक्षा-एसटी धडकेत चौघांचा मृत्यू

नारिंग्रे स्मशानभूमीजवळच्या वळणावर अपघात; वर्षा पर्यटनावरून परतताना घडली दुर्घटना

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
21st June, 11:09 am
सिंधुदुर्ग हादरला! देवगडमध्ये भीषण अपघात, रिक्षा-एसटी धडकेत चौघांचा मृत्यू

देवगडः मागील काही दिवसांपासून अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढले असून सिंधुदूर्गातील (Sindhudurg) देवगड तालुक्यामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर येतेय. नारिंग्रे-कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

या धक्कादायक घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आचरा (Achara-Malvan) येथील रिक्षा व्यावसायिक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे रिक्षेने वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.

वर्षा पर्यटनाहून निघताना नारिंग्रे स्मशानभूमीनजीकच्या एका वळणावर अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना त्यांच्या रिक्षेची धडक एसटीला बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की या अपघातात रिक्षाचालक संकेत घाडीसह अन्य तिघांचा जागीच मृत्यू झाला तर रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले.

हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक होते. घटनेची माहिती मिळताच मिठबांव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस (Police)  निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात (Hospital) नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकांसह रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. 

हेही वाचा